कविता आहे अल्पसंख्याकित भाषा
मी सुरुवात करेन कवितेच्या श्वासापासून, अॅसिडिटी किंवा पी एच पासून
ती एका स्त्री सारखी चाललेय
न पाहिलेल्या हत्याकांडापासून दृश्यतेच्या छळछावणीपर्यंत
ती फुत्कारतेय रीत आणि चमक
एक अगदी शेजारचं महाकाव्य
कवितेमध्ये, भाषा स्वत:च्या
बहिर्या कानावर पडते
आणि शब्द शक्ती वाढवतात जवळच्या शब्दांची
कवितेत अक्षरांना इतकं थंड करावं लागतं
की ते विकसित करतील अशक्य शक्यता, अशक्य दुवे
जसे की, किलबिलीची बदलणारी लय
गोष्ट दुसर्या बदलांची
आकाशातलं मच्छरांचं हसणं
असं नाहीये की तुम्हाला कळत नाहीये अरेबिक
तुम्हाला कळत नाही कविता /
तुम्हाला कविताच कळत नाही.
अनुवाद
तिच्या आवाजाचा शोध मला तेव्हाच लागला
जेव्हा ती मला समजणार्या भाषेत बोलू लागली.
पण काही हरकत नाही
आम्ही उपटून काढली भाषेत रूपांतरित झालेली मूळं
(त्या भाषेत माझं नाव
चार अक्षरांचं असण्याची शक्यता आहे
किंवा शक्यता आहे ते चमकदार असण्याची
जर प्रिय असं विशेषण लागलं नावासमोर)
तुम्ही काहीही म्हटलंत तरी कुठे फरक पडतोय
जोपर्यंत तुम्ही इटालियनमध्ये बोलताहात
किंवा बोलता आहात आईसलँडिकमध्ये
माझ्या समोरच्या इजिप्शिअन बाईचं डाव्या हाताने लिहिणं
मला आरशातल्या प्रतिबिंबासारखं भासतंय
असो, जगभरातले काही लोक मार्जिनकडे लिहीत जातात
तर काही सेन्टरकडे
तुमच्या जिभेवर तीळ आहे म्हणजे जरुरी आहे नव्या डान्स स्टेप्स शिकण्याची
काहीही असो एकमेकांची गळाभेट घेणंसुद्धा
आहे एक अनुवाद.