साठीनंतरचे हस्तमैथुन
(एक)
फुटावीत नव्याने डौलदार
काळी शिंगे,
पंचमुखी बारा लिंगी,
– तीर्थ क्षेत्रे.
फोडून, काळेनिळे खडकांचे
जाळे,
फुटून जावीत,
आरपार
सगळी बिंगे.
ब्रेकिंग :-…
कर्कश कळप उधळवावेत,
स्क्रिनवरील चॅनलची सगळी
बटणे उसकटून,
न्यूजरीडरचे दात मोजावेत, एक एक
उचकटून बत्तीशीच्या बोळक्यात
ओली जीभ फिरवावी,
नागाच्या फण्यासारखी उठणारी
आठवण,
चवीचवीने चुरगळावी.
पन्नाशीनंतर गिळलेला डाव्या
पायाचा अंगठा,
बाळकृष्ण लंगडा,
एकेक गुडघ्यातून
घरंगळणारा वेदनेचा,
बैंगण बुटका
दुमडून दोन्ही पायांवर रांगावा
करीत गावभर कांगावा,
आणि तिसरा पाय
बळीच्या डोक्यावर ठेवल्यासारखा,
चंद्रावरील यानाने बाहेर काढावा तसा,
अगदी तसाच
जरा मग उघडू द्यावा.
मुतावे मग जेवढे जमेल तेवढे.
लांब गेलेले सगळे वास,
कनौजी बुधले खास,
गादीत नाक खुपसून घुसळावेत,
ओळखता आले तर ओळखावेत.
वाचलेल्या कवितेच्या पानाला
आरशासमोर धरावे,
दिसणारी उलट्या अक्षरांची भुते,
पेâर धरून नाचण्याआधीच, एकेक
ओळीने गिळावीत,
सावकाश रवंथ करून
चोथा,
म्हणजेच कविता,
गुळणी करून थुंकावी,
पाठोपाठ येणारी खोकल्याची उबळ,
भुंकत, भुंकत,
मागे लागलेल्या कुत्र्यांना गुंगवत, रमवत
बारा शिंगांना मिरवत, फिरवत
पापणीच्या केसांमधल्या फटीतून मागे पहावे.
किंवा दचकून उठण्याआधीच,
जमेल तसे झोपी जावे.
(दोन)
झोपेत उठून चालायला जावे. झोपेतच
ट्रेड मिलवर जॉगिंग करावे,
निथळणाऱ्या घामाचा वास,
वेट लिफ्टिंग मशीनचे हात
उंचावून, वर खाली करत,
काखेतून फवारावेत
साऱ्या जिमभर आपल्याच
घामाचा वास दरवळावा.
तसे, सगळेच सॅनिटाईझ करावे—
पाय वर करून कुत्र्यासारखे
जागोजाग हुंगून हुंगून,
गुढ्या आणि तोरणे बांधावीत.
डॅशबोर्डवरील अक्षरांना आपलेच केस चिकटवावेत.
एक्स बॉक्स ३६० वर उगवणाऱ्या गवतासारखे त्याचे बांबू व्हावेत;
जॉयस्टिक वर परागकणांची धूळ जमावी—
फ्लोअरवर पसरून, पाय
ताणून किंवा गुडघ्यात मोडून,
ढुंगण उचलणाऱ्या प्रत्येकीलाच,
आपल्या कळपात घ्यावे.
`वन मोअर, यू कॅन डू इट,
पुश नाऊ—’
असे ओरडत किंवा नुसतेच रडत,
(ओ-रडत, ओ-रडत)
या कुशीवरून त्या कुशीवर वळावे,
सांधे कुरवाळावे,
कण्हावे,
अ, आ, इ, ई, उ, ऊ म्हणावे,
मोनींगची अख्खी रागदारी
गाऊन पहावी, माना मोडून ताना माराव्यात
सुस्काऱ्याचा मस्कारा पापणीवरून
टिपून घ्यावा,
जमेल तेवढा त्याचा तवंग पकडून
पतंग करावा,
शवासनातच
तरंगावे.
बुडावे.
वर यावे.
किंवा अगदीच काही जमलेच नाही
तर,
उगवावे.
कुत्र्याच्या छत्रीसारखे.
मुतलेल्याच जागेवर,
उभे रहावे,
आकाश तोलत,
गिर्रेबाज अळिंबीसारखे.
रंगीत, संगीत, समग्र आणि
क्षणभंगूर मग्न.
म्हणून संपूर्ण नग्न.
आपल्यातच आपण आपल्याला पहावे.
(तीन)
बेस्ट म्हणजे मंत्र म्हणावेत.
जागरण करावे. चॅटिंग, मग चान्टींग.
दीर्घ श्वसन करावे. लांब लांब श्वास घ्यावेत.
सोडावेत.
उपडे पडून, `प्रेस एनी की टू स्टार्ट’
म्हणावे.
की बोर्डवर बोटे फिरवावीत.
दोन बटणांच्या मध्ये घालावीत.
बटणे दाबावीत.
बटणे खोलावीत.
बटणे तोडावीत.
बटणे चावावीत. किंवा
बटणे नुसतीच चोखावीत.
बटणांचा पियानो पसरवावा,
किंवा बटणे खोलून,
तारांचा तंबोरा मिरवावा.
सरळ डिजिटल व्हावे.
सूक्ष्मात सहज शिरावे.
गेम सेंटर चाळावे.
अवतार घ्यावेत.
वूâर्मापासून कलीपर्यंत,
दशावतारी रूपे घ्यावीत.
साठीची नाठी काठी घेऊन
डोंबाऱ्यासारखे बांबूवर बांधलेल्या
दोरावर चालून दाखवावे.
डुक्कर बनून भूदेवीचा चिखल
चिरडावा. माखावा किंवा तुडवावा.
अवतारी पुरुष बनून हजार डोळ्यांचा
पिसारा समोरच्या स्क्रिनवर
फुलवावा.
गौतमी, अनुसया, अहिल्या बिहिल्या,
जी मिळेल तिचा उद्धार करावा.
डिजिटलाच्या पटलावर किंवा
नुसतीच एखादी सोंगटी व्हावे.
सापशिडीतील ९९ नंबरच्या घरात पडावे.
पडून रहावे.
पोर्नस्टार बनावे.
लिंग बदलून अदलून काय वाट्टेल ते व्हावे.
मांजर, कुत्रे किंवा घोडा आणि
गाढवसुद्धा होऊन पहावे.
आई माई बाई ताई अक्का भाऊ दादा तात्या काका मामा बनावे, बनवावे.
ओणवी किंवा पाठीवर,
पोटावर किंवा उभी,
आडवी किंवा तिडवी,
पुढून, मागून किंवा जिथे
मिळेल तिथून,
ते म्हणतील तशी,
गोगलगाय बनून पडून रहावे.
पाय पोटात घ्यावे.
हलू नये डुलू नये
उतू नये मातू नये.
मग लॅपटॉपची घडी करावी.
घडीची होडी किंवा शिडी करावी
वल्हवावी किंवा चढून शिडीवर
चंद्राला मनसोक्त चाटून घ्यावे. त्याच्यावरच्या
सशाला उशी करून
कुशीत घ्यावे.
ेaहराान्.व्प्aहव्arॅुस्aग्त्.म्दस् –संजीव खांडेकर