डॉल्फिन परतले
डॉल्फिन परतले व्हेनिसच्या कालव्यात
मी काल रात्री कल्कीला पाहिला
रेड झोनमधून ग्रीन झोनमध्ये शिरताना
मास्क घालून घोड्यावर
एका हातात तलवार दुसर्यात सॅनिटाईझर
त्याच्या घोड्यानेही मास्क घातलेला
डॉल्फिन परतले व्हेनिसच्या कालव्यात
पण एखाद वेळेस लॉकडाऊनही संपेल पण
माझ्या मनातला क्वॉरन्टाइन नाही संपणार कधीच
मी माझ्या कोरड्या कालव्यात वाट बघत बसतो
पण डॉल्फिन कधीच नाही परतणार माझ्या भकास कालव्यात
डॉल्फिन परतले व्हेनिसच्या कालव्यात
आणि माझ्या डोळ्यांसमोर मी पाहिला
मास्क युगापूर्वीचा समाज कालबाह्य होताना
डॉल्फिन परतले व्हेनिसच्या कालव्यात
आणि मी स्वप्नात पाहतो
चालू असलेल्या झूम मीटिंगमध्ये
माझेच शेकडो चेहरे
मास्क घातलेले
मी पाहतोय हाताच्या बोटांचे डॉल्फिन होताना
त्यांच्या तोंडावरही कोणीतरी मास्क बांधलेत
ते आता कधीच गाणार नाहीत गाणी
माद्यांना रिझवण्यासाठी
की बाळांना झोपवण्यासाठी
डॉल्फिन परतलेत
पण कालवे आता तेच राहिले नाहीत
आणि माहितीसारखी तू अनप्रेडिक्टएबल इररिव्हर्सएबल
जिथे वासना होते रिडनडंट
जिथे काया असते व्हर्च्युअॅलिटी
अन् आत्मा हा विठ्ठलाची बायनरी अनअॅवेलएबिलिटी
आणि आता मन कुठे इतरत्र धावेलच कसं
तू जरी असशील मृगजलाची गंगोत्री डिजिटल
आणि संतुलन हरवलेलं असेल
माझं स्टोकॅस्टीक मन
पण तुझ्या बाहेरचं
हे कोरडं कोडगं जग स्ट्रेनज अॅट्रॅक्टर
पुन्हा आणून सोडतं मला
जिथे मी पूर्वी होतो
आयुष्य असं रिकरसिव असतं
मृत्यू ते मृत्यूमधली जागा असते
प्रâेकटल
सनी लिओनी आणि लॉरेन्झचं फुलपाखरू
सहाराच्या वाळवंटात कुठेतरी
लॉरेन्झच्या फुलपाखरानं पंख फडफडवलं यामुळे
चीनमध्ये आलेल्या चक्रीr वादळासारखी तू
येऊन धडकलीस आमच्या हँग झालेल्या
जागतिक खेड्यात
थर्मोडायनामिक्सच्या सगळ्याच नियमांपलीकडे
तुझं साम्राज्य
एंट्रोपीपेक्षाही सुंदर तू
मृत्यूसारखी
नाश्ता रेडीय
माझं प्रेम
पांढर्या शुभ्र रिकाम्या कप बशीसारखं
मुकाट्यानं टेबलावर बसलंय
मी माझ्या हृदयाचं अंड फोडून
ओततो कपात सोनेरी रस
आणि एक करप्ट सूर्य
रिकाम्या कपात
ब्रेडच्या स्लाइसमध्ये राहून गेलेत
माझे हॅक झालेले डोळे
दुपारी वेळ मिळाल्यावर त्यांचे पासवर्ड बदल