Sabita Satchi
दिल्ली-२००७

आठ फ्लॅट्स दरम्यानच्या

छोट्या पार्कमध्ये

पाच किशोरवयीन मुले

एसएमएस टाइप करतात

बेडरूममधल्या खिडकीच्या चौकटीवर

दोन राखाडी-काळे कावळे

दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीची

तिरक्या नजरेने नोंद घेतात

तीन म्हाताऱ्या

एकत्र जमून

लोकरीच्या गोळ्यांमध्ये

हिवाळा विणतात

चमचमणाऱ्या सँडल्समधील

आठ तरुण पावले

सणासुदीच्या उत्साहात

डिस्काउंटेड दुकानातून

बाहेर पडतात

चार हिजडे

फ्लायओव्हरखाली

विड्या फुंवूâन,

शिव्या खाऊन

पोट भरतात

सहा गझला

एका सुफी संतांच्या

थडग्यावरून

ठिबकत राहतात

रात्री दोन वाजता

फुगून गेलेला श्रीकृष्ण

यमुनेवर तरंगतो,

निर्जीव 

-अनुवाद मन्या जोशी 

इथे, आत्ता

ही रात्र

हे आभाळ

पक्ष्यांशिवाय

हे शब्द

माझ्या त्वचेवरून उसळणारे

सतत अभाव

तुझ्या प्रकाशाचा

शेवटची ट्रेनदेखील

निघून गेलीय

पाऊसही

झोपी गेलाय

दे मला पुन्हा

भाषांची कला 

-अनुवाद मन्या जोशी 

बंडाचा शोक

ते येतात घेऊन

लाठ्या आणि रेशमाच्या संगिनी

सूर्य जेव्हा जातो दमून

त्याची किरणे झिजून

आम्ही सर्व कोसळतो

गुलाम, राजा आणि राणी

एक्का व दुर्री

दुर्बळ, भुकेले

दहा जण पत्त्यांमधले

लाल आणि काळे

काळे आणि लाल

पाझरवतात फुले

रंग मरणांचे

रंग मरणांचे 

-अनुवाद मन्या जोशी