Najwan Darvish

गमावण्यासारखे काय बाकी?

ठेव माझ्या छातीवर डोकं

आणि ऐक 

विध्वंसाचे थर 

ऐक, कापून पडलेली घरं 

सलादिन मदारस्याच्या मागे 

लिफ्त गावात 

ऐक, एक उद्ध्वस्त गिरणी 

मस्जिदीच्या तळमजल्यावरील

मदरश्याच्या तळघरातले

धडे आणि अभ्यास 

ऐक 

बाल्कनीतले दिवे 

शेवटचे 

विझून जाताना 

वाडी सालीबच्या कळसावरून 

ऐक, जमाव जड पायांनी चालताना 

ऐक, जमाव परतताना 

ऐक, त्यांची शरीरे फेकली जात असताना 

त्यांचा सी ऑफ गॅलेलिच्या तळाशी 

चालू असलेला श्वासोच्छ्वास, ऐक

देवदूताच्या पहार्‍यातील

तळ्यामधल्या माशासारखा  

गावकर्‍यांच्या कथा 

कवितेत विणलेल्या 

काफियासारख्या 

ऐक वय वाढत चाललेले गायक 

त्यांचे वय नसलेले आवाज  

ऐक कुरणं ओलांडणार्‍या 

नाझारेथच्या बाया

ऐक तो उंटपाळ

जो मला सतावतो, सतत 

जेरुसलेम (१)

तुझ्यासाठी बळी चढवायला 

आम्ही टेकडीवर उभे होतो 

जेव्हा आमचे उंचावलेले हात आम्ही पाहिले

रिकामे 

तेव्हा आम्ही समजलो 

आम्हीच तुझे बळी 

संपू देत नश्वर जीव 

इतर नश्वरांच्याच हाती 

तू एकटा कायम 

ही भ्रमयात्रा 

कायम नसलेल्यांची 

काय देणे घेणे तुला त्याच्याशी?

आमचे हात उंचावतात,

रिकामे 

आम्ही तुझेच बळी

जेरुसलेम (२) 

मी जेव्हा तुला सोडून जातो तेव्हा दगड होतो 

मी जेव्हा परततो तेव्हा दगड होतो

मी तुला मेडुसा नाव देतो 

मी तुला सोडोम आणि गोमोराची मोठी बहीण म्हणतो 

तू बाप्तिस्माचे पाणी रोमला ज्याने जाळून राख केले  

ज्यांची हत्या झालीये, ते डोंगरावर आपली कविता गुणगुणत आहेत 

बंडखोर, त्यांची कथा ऐकवणार्‍यांची निर्भर्त्सना करत आहेत 

आणि मी समुद्राला सोडून तुझ्याकडे परततोय

परततोय, या छोट्या नदीच्या कडेकडेने 

जी वाहतेय तुझ्या दु:खात

कुराण पढणार्‍यांना मी ऐकतोय आणि कफन चढवणार्‍यांनाही 

शोक व्यक्त करणार्‍यांच्या पायाची धूळ मी ऐकतोय 

मी अजून तिशीचाही नाही आणि तू मला पुरूनही टाकलंस 

पुन्हा पुन्हा, तुझ्यासाठी मी जमिनीतून बाहेर येतो 

तर, तुझे गोडवे गाणारे जाऊ दे खड्ड्यात

जे तुझ्या दु:खाचे भांडवल करत आहेत,

ते सर्व जे माझ्याबरोबर आता या फोटोत आहेत  

मी तुला मेडुसा नाव देतो 

मी तुला सोडोम आणि गोमोराची मोठी बहीण मानतो 

तू बाप्तिस्माचे पाणी जे आजही जळत आहे 

मी जेव्हा तुला सोडून जातो तेव्हा दगड होतो 

मी जेव्हा परततो तेव्हा दगड होतो

या वृक्षांसारखा 

वृक्षांचा उद्देश आहे न कोसळता डोलत राहण्याचा 

कारण इथे कोसळलेल्या वृक्षांना जमीन सामावून घेत नाही 

किंवा, अगदी कुणीही 

सहन होत नाहीये त्यांना आता 

सडत चाललेली त्यांची मुळे  

आणि आपले जीवन वार्‍यावर सोडून दिल्यामुळे  

त्यांना त्यांची किंमत चुकवावीच लागणार 

त्यांना कायम कोसळावेच लागणार 

म्हणून तू जेव्हा फूटपाथवर 

झोकांड्या खात लटपटत चालशील

आशा करतो की तू पडणार नाहीस 

हो, नाही तर कायमचाच कोसळशील

हो पुढे आणि खुशाल कर कल्पना

की वृक्ष तुझ्यासह डोलत आहेत आणि  

वारा तुझ्या कोसळण्याचे स्वागत करत आहे, 

तू, जो जगलास या वृक्षांसारखा 

जमिनीशिवाय 

मुळांशिवाय