Gokchenur C
आलिशान घरटे

आमच्या स्त्रिया आनंदी आणि निरोगी होत्या,

सशांसारखा भित्र्या आणि प्रजजनशील

एक रक्तपिपासू वीझल,

आमच्या बंदिस्त तृष्णांचा

पिच्छा पुरवत असताना

काटेरी झुडुपाखाली

आम्ही त्या रसाळ परिपक्व

आंबट गोड फळाचा

मनमुराद स्वाद घेतला

आमच्या आयांनी हातोटीने

खडकांवर अडवूâन फाटलेल्या

आमच्या मासेमारीच्या जाळ्या

विणल्या आणि दुरुस्त केल्या

आकाश, धान्य आणि घोडे आमचे बाप होते

आता दुर्दैव असे की

पूर्णपणे रिक्त धान्याच्या कोठाराशीही

होऊ शकत नाही

तुलना आमच्या हृदयांची

काय झाले आम्हाला?

भूक, कॉलरा आणि टायफसने

वेढले आमच्या बेटांना

एकदा का आम्ही यातून मार्ग काढला की

खरंच का लागू आम्ही मार्गी?

संपेल का आमची कथा तिथेच? की होईल सुरू? 

-मराठी अनुवाद : मन्या जोशी

प्रेम

हे प्रेम आहे, ते म्हणतात, ते बरे करते

देवाची तुटलेली बोटे

त्याच्या डायरीमधील तळटिपेतील वेळ

करते स्पष्ट गोष्टींचा हरवलेला अर्थ

हे प्रेम आहे, ते म्हणतात, पूर्वजांनी

बांधले असावे स्मारक

भाषेच्या काटेरी सपाटीवर, आवाज

लढू शकत नाहीत पावसाच्या अनवाणी घोड्यांशी 

-मराठी अनुवाद मन्या जोशी

राकीच्या स्नेहसंमेलनचा तो फोटो

मी जर मेलो, आणि हे शक्य आहे,

तर मला व्हायोलिन पेटीत दफन करा

एका जिरेनियम संध्याकाळी,

एका पेअरच्या झाडाखाली

मी जर मेलो, आणि हे शक्य आहे,

माझ्या स्मृतिप्रीत्यर्थ कवितेचा पुरस्कार ठेवू नका

मी जर मेलो, जरी मी कधीही मेलो नसलो तरीही,

मला तुर्कीच्या थोर स्वरसादृश्यात दफन करा

तिच्या विनम्र यमकांत

गज़लेच्या रदीफात, जाणार नाही, राहणार

मी जर मेलो, जरी मी कधीही मेलो नसलो तरीही,

माझ्या निवडक कविता प्रसिद्ध करू नका

मी जर मेलो, कारण यंदा मरून जाण्याची पॅâशन आली आहे,

त्या राकीच्या स्नेहसंमेलनाच्या फोटोत मला दफन करा,

बघा कसे उत्साही दिसतोय आम्ही फोटोत

जणू काही आम्ही एक अंक काढणार आहोत

आणि अंकाच्या नावावरून वाद घालत आहोत

मी जर मेलो, कारण यंदा मरून जाण्याची पॅâशन आली आहे,

पावसाचे कारण देऊन माझ्या मृत्यूनिमित्त ठरवलेल्या सर्व सभा रद्द करा

जिवंतपणी कोणीही कवितेपार जाऊ शकत नाही

शक्य असेल तर, कुठल्याच रस्त्याला माझे नाव देऊ नका,

आणि अगदीच नाइलाज असेल आणि माझा पुतळा उभारायचा असेल

तर एखाद्या समुद्रकिनाऱ्यावरच्या पार्कमध्ये उभारा

म्हणजे समुद्रपक्षी मुक्तपणे माझ्या डोक्यावर शिटू शकतील

खाऱ्या वाऱ्याच्या माऱ्याने पुतळ्याखालचा गंजका फलक काळवंडू दे

गॉकसेनूर सी : कवी

जन्मतारीख : अज्ञात

मृत्यूची तारीख : त्याला सांगू नका, त्याला माहीत नाही की तो मेला आहे 

-मराठी अनुवाद मन्या जोशी