Home August 2021कविता Dinkar Manvar-कविता

Dinkar Manvar-कविता

जसजशी दुपार होत जाते

तसतसा कोवळा देह

जात राहतो करपून

मग आपल्या नात्याची बोगनवेल

कितीही पाणी दिलं तिला तरी

कोमेजून जाणार नाहीतर काय होईल

शरीराचं नातं रक्ताबिक्ताचं नसतंच मुळात

वासनेच्या सर्पाचा विळखा असतो जखडलेला

अख्ख्या देहाला

उगाच भ्रामक कल्पनांमध्ये

तू मला जखडून टाकू नकोस

रात्र झाली की माझं शरीर

शरीर राहत नाही

सर्पाचे वारूळ बनते

२.

पुन्हा सकाळ होईल

सूर्य एखाद्या धारदार पात्यासारखा

सरसरत वर येईल

सगळी झाडं दु:ख एकवटून

पुन्हा ताटकळत उभी राहतील

जीव मुठीत धरून

झोपेतून सगळे जागे होतील

मीही जागी होईन?

स्वत:ला कसल्या तरी कामाला

जुंपून टाकेन

काल जसं होतं अगदी तसंच असेल

कशातच बदल झालेला नसेल

आपल्याला नको असलेल्या गोष्टींनी

पुन्हा डोकं वर काढलेलं असेल

आज कुणीतरी कुणाच्या चिमटीतून सुटून

सहीसलामत भटकत राहतील

कुणाला तरी कुणाची आठवण येईल

मन उदास होऊन

समुद्राच्या काठावर बसून राहतील

आपल्याला हवं असलेलं जग

आपल्या सभोवती नसेल

नको असलेलं भलतंच काहीतरी

डोळ्यांत साठवून जाईल

३.

संध्याकाळ झाली की घराकडे

परतायचं म्हणून सगळेच परततील

रात्र झाली की मन मारून झोपी जातील

पुन्हा सकाळ होईल

दु:खीकष्टी मनानं सगळेच जागे होतील

सूर्य पुन्हा धारदार पात्यासारखा

सरसरत वर येईल

पुन्हा कुणाच्या तरी आठवणीनं

कुणीतरी उदास होऊन जाईल

सगळ्या आठवणींवर शेवाळ

साचत जाईल