जानेवारीतल्या झाडांच्या वेड्यापिशा फांद्या
आता कुणी नसेल या संत्र्यांच्या जानेवारीतल्या
वेड्यापिशा फांद्यांच्या खाली
दोन झाडांच्या कटात पडलेली संत्री वेचायला
त्यांना थांबावं लागेल बिलियर्ड्सच्या बॉल्सप्रमाणे विखुरलेल्या अवस्थेत
(जोपर्यंत ते तुटणार नाहीत हृदयाप्रमाणे)
मग तो खोडकर पाऊस येईल
जखमी झाल्येल्या संत्र्यांच्या आतल्या सावलीत घुसेल
दोन संत्र्यांच्या झाडांच्या भव्य गोष्टीखालून बाहेर पडेल एक
थोडासा कर्कश गंध
मातीच्या सुगंधात घुसळलेला
आणि पानांच्या वर टांगले आहेत पाण्याचे थेंब
आता कुणी नाहीये त्या संत्र्यांच्या सावलीला अलगद स्पर्श करणारं
एक खेळ खेळला जातोय
जो पोचतोचतोय त्याच्या अंतापर्यंत आणि
आता ही फुगवलेली गोष्ट की
‘एक काळा गोळा
जमिनीवर पडल्याची’
सूर्य आता फांद्यांच्या मध्ये उगवलाय
पण तो लवकरच नाहीसा होणारेय
ह्या शांत आकाशात जमली आहे भयावह पावसाची शक्यता.
एक नजर टाकली तर
मला आठवत नाहीये की मी कसा बाहेर पडलो रसेल स्क्वेअर मधून
कसा गेलो अंडरग्राऊंड ट्यूब-स्टेशनात
कुठे घेतलं तिकीट
मी कशी नजर टाकली, टाकलीच असेल तर चेहर्यांवर
कसं काय मी स्वत:ला सावरलं/
गमावलं नाही लक्षात राहिलेलं आसपासचं जग
जवळून वाहणारं स्वत:ला न गमावता
तुझ्या अपेक्षेने उभा असलेला मी
फोनवर मी ऐकले तुझे भरलेले डोळे
आणि तुझे शब्द माझ्या तुटलेल्या
हृदयाच्या आरपार जाणारे.