Adam Zagayevsky

वाटेत

१. ओझ्याशिवाय 

काहीही सामान न घेता 

प्रवास करायचा 

ट्रेनमधल्या टणक

लाकडी बाकावर झोपायचे, 

गावाला विसरायचे, 

छोट्या स्टेशन्समधून 

बाहेर पडायचे

जेव्हा आकाश ढगाळते 

आणि 

मासेमारी बोटी 

समुद्रात निघतात

२. बेल्जियममध्ये 

बेल्जियममध्ये रिमझिमत होते आणि 

नदी डोंगराला विळखे घेत होती. 

मला वाटलं, किती अपरिपूर्ण आहे मी.

झाडे हिरव्या कुरणात स्वस्थ 

जसे हिरव्या कॅसॉकमध्ये धर्मोपदेशक

रानगवतात लपलेला ऑक्टोबर,  

नाही ताई, मी म्हणालो

हा डबा 

न बोलणार्‍यांचा आहे

३. हायवेवर घिरट्या मारणारा बहिरा ससाणा 

निराश होईल जेव्हा झेपावेल खाली  

लोखंडी पट्ट्यांवर, गॅसवर,

एका निरस म्युझिक टेपवर 

आपल्या संकुचित हृदयांवर 

४. माँट ब्लॅन्क 

दुरून चमचमतो, शुभ्र आणि सावध 

जणू सावल्यांसाठी कंदील

५. सेगेस्ता 

हिरव्या कुरणात एक भव्य देऊळ 

एक हिंस्र श्वापद 

आभाळासाठी खुले   

६. उन्हाळा 

प्रचंड उन्हाळा, जेत्यासारखा

आणि आमची छोटी कार 

वाट चुकल्यासारखी 

वेरडुनच्या रस्त्यावर

७. बायटोममधील स्टेशन 

बोगद्यात सिगारेटची थोटके फुलतात 

डेझीची फुले नव्हे.  

एकाकीपणाची दुर्गंधी पसरते.

८. फिल्ड ट्रीपवर निघालेले निवृत्त लोक 

शिकतायत 

जमिनीवर चालायला 

९. सागरी पक्षी 

अनंत काळाला प्रवास नसतो 

अनंत काळ थांबून राहतो.

मासेमारी बंदरात 

फक्त समुद्रपक्षी

मात्र टिवटिवतात 

१०. टाओरमीना मधील थेटर 

टाओरमीनाच्या थेटरमधून तू पाहतोस 

एट्नाच्या माथ्यावरील बर्फ 

आणि चमचमणारा समुद्र 

दोघांपैकी कोण चांगला अभिनेता आहे?

११. काळे मांजर 

एक काळे मांजर अवतरते 

जणू काही आम्हाला सांगायला 

त्या रोमन चर्चला काय पाहता 

माझ्याकडे पाहा

मी जिवंत आहे

१२. एक रोमन चर्च 

दरीच्या पायथ्याशी 

एक रोमन चर्च विश्रांत:

वाइन आहे या कास्कमध्ये.

१३. उजेड 

जुन्या घरांच्या भिंतींवर उजेड 

जूनचा महिना. 

पथिका, उघड तुझे डोळे.

१४. पहाटे

जगाची ऐहिकता पहाट होताना –

आणि जीवाची दुर्बलता