१.
कपाटात ठेवलेली
आवडीची पुस्तकं
वाचायची आहेत पुन्हा
मित्रानं भेट दिलेल्या डायरीवर
लिहिलं नाही अजून काहीच
दिवाळी अंक, मासिकांवरील
झटकायची आहे धूळ
अपूर्ण कविता
करायचीय पूर्ण
तुंबलेले काळे ढग विरघळले की,
वाहायचेय बंधमुक्त
२.
खूप दिवसांनी
लिहिली कविता…
पुन्हा केव्हा सुचेल?
काळ बसलाय
फणा काढून पुढ्यात
ही कविता
शेवटची तर नाही?