Home August 2022 संदेश ढगेच्या सहा कविता
संदेश ढगेच्या सहा कविता
नुसत्या कटकटीने भारवलाय मॉर्निंग वॉकचा रस्ता

नुसत्या कटकटीने भारवलाय मॉर्निंग वॉकचा रस्ता

लहान मुलाने हट्ट धरलाय

समोरच्या मुलाकडे आहे तशाच सायकलचा

तरुणांच्या गप्पात मुरलोय

लग्नानंतर नकळत विकल्या गेलेल्या

स्वातंत्र्याची गाथा

जाड्या भरड्या बायकांना हवी आहे वंâबर

पूर्वीसारखी

त्यासाठी त्यांची तयारी आहे भसाभसा व्यायामाची

वयस्कांना वाटतोय कालच्या सारखाच आजचा दिवस

सुनेचा मळलेला आवाज

काढून टाकतात ते श्रवणयंत्रातून

या सगळ्यांच्या `क्रॉस कनेक्शन’ने

जिवंत सळसळते प्रसन्न सकाळ

मौनालाही आग्रह केला जातो दरडावून बोलण्याचा

एक अघळपघळ तरुणी मोबाईलवर झापतेय मित्राला

ये शाणे! तु मुझसे बोलता क्यू नहीं

कुछ तो बोल ना यार!

तुझे तेरी बिबी की कसम

 

मला कुणी बनायचे नव्हते

मला कुणी बनायचे नव्हते

पण सगळ्यांनी मिळून मला बनवले

नोकरचा ड्रेस घालून लोटले रंगमंचावर

मी घाबरून पळालो विंगेत धडपडत

तर लोकांनी टाळ्या वाजवल्या

मग कवी बनवण्याचा घाट घातला त्यांनी

उठले अनेक रंग माझ्या मस्तकावर

आणि सोडले मला वा‍Nयावर

मी हवेत डुललो

मनात बोललो

तिथेही झाली गोची

बोलणे माझे होते म्हणून त्यांचे नाही झाले

माझी तयारी पाहून

लवकरच त्यांनी नाद सोडला माझा

नाहीतर लाल चोच रंगवून

पोपट बनवण्याचा त्यांचा प्लॅन होता

 

शाळेत असताना

शाळेत असताना

लाकूडतोड्याची गोष्ट मला आवडायची

मोठेपणी जंगलं राहिली तर

मी ही होईन असाच प्रामाणिक

असे वाटत राही

लाकूडफाट्याची गरज नसताना

मोठेपणी मी गेलो हौसेने जंगलात

झाडावर न चढताच

कुर्‍हाड पाडली विहिरीत

हात जोडून अभिनयाने रडलो

तर देवीने दिली वर आणून

सोन्याची कुर्‍हाड

`थँक्स. ही नाही माझी’ – मी म्हणालो

नाही म्हणालो नसतो तर संपली असती ना गोष्ट

खरं तर माझी सोन्याची कुर्‍हाड होती

पण शाळेतल्या गोष्टीवर अन्याय घेऊ नये म्हणून

मी अप्रामाणिक झालो होतो

वाढत्या वयाबरोबर

 

मित्राला परमेश्वर बनायचे होते

मित्राला परमेश्वर बनायचे होते

तो त्याच्या सरावात उत्तीर्ण झालाही

चांगूलपणाचा सर्व अर्क त्याच्यात मुरला देखील

एके ठिकाणी ज्यादा ताकद वापरल्यामुळे

त्याचे परमेश्वर पद हुकले

म्हणाला, मला सोपी प्रश्नपत्रिका आवडत नाही

हे परमेश्वर बिरमेश्वर होणं फारच सोपं आहे

तरीही पुन्हा एकदा

त्याला परमेश्वर व्हावेसे वाटले

यावेळी त्याने पूर्वीची चूक केली नाही

सरळसरळ माणसाच्या मूळ रूपात भरकटला

आणि पुन्हा एकदा

त्याचे परमेश्वर पद हुकले

 

आधी कुंडीतल्या फुलझाडांनी

आधी कुंडीतल्या फुलझाडांनी

पाणी द्यावं की

आधी कविता लिहावी?

आधी काय सुचलंय

त्याला न्याय द्यायला हवा

असाही एक निर्दयी विचार मनात आला की,

फुलझाडे काही मरणार नाहीत लगेच

पण कविता निसटून जाऊ शकते?

तिच्या जन्माची वेळ हीच तिच्या मृत्यूची असते

किरकोळ वेळ निघून जाण्याच्या

वेळेशीच सुरू आहे हा लढा

एक मात्र नक्की

एखादं फुलझाड ताजे राहण्यासाठी

केलेल्या सत्कर्मानंतर

सुचतील अनेक शब्द भसाभसा

नाहीतर असंही करता येईल

कवितेत घालावे ओढूनताणून पाणी

आणि फुलझाडांना द्यावे सोलीव शब्द

बहरणं तर दोन्ही ठिकाणी आहे

मुळातून टिकलेल्या जिवंतपणावर

 

खूप कठीण असतं रे बाबा कविता

खूप कठीण असतं रे बाबा

आपल्या आवडत्या कवीला

चारचौघात सिद्ध करणं

हे चारचौघं असतात ना

एवंâदरीत मारेकरी कोणत्याही कवीचे

आणि सुदैवाने निघतात आपले मित्र. स्वयंभू.

खूप कठीण असतं रे बाबा

दारूच्या टेबलावर

आपल्या आवडत्या कवीला सिद्ध करणं

दारूच्या टेबलावर सामनेवाल्याचं

ज्ञान उफाळून आलेलं असतं अफाट

बिलाच्या किमतीहून किंचित वरचढ.

मूळव्याधीची जागा सिद्ध करतांना

भलत्या ठिकाणीच चाचपडणं

तशी होते केविलवाणी अवस्था

दारूच्या टेबलवर.

सिद्ध करणारा मूर्ख असतो. नाहीतर अहंकारी. अंध.

चुकीच्या पार्टनरबरोबर रात्र नागवी करतांना

त्यानेच अवमान केलेला असतो

आवडत्या कवीचा.

खूप कठीण असतं रे बाबा एकट्याने झिंगणं

सिद्ध करणार्‍यानेच स्वीकारलेला असतो पराभव

दुकटं अनुभवण्याचा.

मन्या ओकने देखील उंदीर भाड्याने आणले होते कवितेत

दुकटं अनुभवण्यासाठी.