Home August 2022 गप्पागोष्टी – सचिन केतकर

गप्पागोष्टी – सचिन केतकर

१. कविता ही कुठले ना कुठलेतरी सत्य सांगत असते व एक सहृदय वाचक हे सत्य जेव्हा आत्मसात करतो तेव्हा त्याला किंवा तिला एक प्रकारचा आनंद होतो, एक प्रकारची मुक्ती मिळते. आजच्या सत्योत्तर (post truth) विंâवा डिसइन्फॉरमेशन/मिसइन्फॉरमेशन अवकाशाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही याकडे कसे पाहता?

२. उत्कृष्ट साहित्य हे एकदा किंवा अनेकदा वाचून आत्मसात करायला एक प्रकारचा अभ्यास आणि संयम लागतो असे मानले जाते. अशा प्रकारचा अभ्यास आणि संयम दुर्मीळ आहे व प्रयत्नपूर्वक घडवावा लागतो. आजच्या डिजिटल युगात मात्र तात्काळ समाधान हीच प्राथमिकता झाली आहे. सहज उपलब्ध समाजमाध्यमांमुळे खूप लोक कविता लिहू लागले आहेत असे आशादायक चित्र दिसते. पण बहुतांशी अशा कविता किंवा लेखन हे प्रासादिक, चटपटीत असते. कवितादेखील कवितावजा भाष्य किंवा कवितावजा अनुभवकथन करताना दिसते. पण अशा कविता लोकांना अपीलही होत आहेत. तर, अशा समकालीन वास्तवात, तुम्ही एकूण काव्य व्यवहाराकडे कसे पाहता? खूप मोठ्या प्रमाणात जे रंजनवादी साहित्य (कथा, कविता, कादंब‍र्‍या, नाटके इ.) निर्माण होते आणि लोकप्रियही.

सचिन चंद्रकांत केतकर

नक्कीच कविता कोणत्यातरी एक प्रकारचा सत्य सांगत असते. आज ज्याला सत्योत्तर (Post Truth) समाज आपण म्हणतो हा नव्या प्रसारमाध्यमातून (New Media) निर्माण झाला आहे, ज्यात सपशेल खोटं आणि असत्य एका मोठ्या समूहापर्यंत क्षणार्धात पाठवता येतं आणि बहुतांशी मंडळी ह्यालाच सत्य म्हणून स्वीकारतात. आज तर भारतीयांचा मेंदूच नव्या आणि जुन्या प्रसारमाध्यमाच्या उपयोगाने Hack झालेला दिसतो. अशा नव्या सत्योत्तर समाजात कवितेचं काहीच स्थान मला वाटत नाही.

कला मात्र करमणुकीसाठी नाहीतर ढोबळ प्रचारासाठी वापरल्या जात आहेत. मूठभर लोक गंभीर साहित्य किंवा कलांकडे वळताना दिसतात. अर्थातच ही प्रक्रिया सुरू होऊन एक दोन शतकं झालीत असं वाटतं.

कलांचा मृत्यू हा विषय हेगेल (Hegel)नी खूप पूर्वीच मांडला होता. त्याचं म्हणणं असं की वैज्ञानिक बुद्धिप्रामाण्यवाद जो भांडवलशाहीबरोबर जन्माला आला आहे तोच मानव चेतनेचा सर्वोत्तम आविष्कार आहे आणि त्याच्यामुळे कला, जी माणसाची जुनी अभिव्यक्ती आहे ती मागेच पडत जाणार.

त्याला प्रतिउत्तर देण्याच्या प्रयत्नात विसाव्या शतकाच्या मध्यभागात मार्टिन हायडेगर ज्यांनी `सत्य’ आणि `कला’ ह्यांच्यातल्या पारंपरिक विचारव्यूहाला मूठमाती देऊन, एका नव्या प्रकारचा paradigm मांडण्याचा प्रयत्न केला व त्यातून कला आणि सत्यविषयी एक नवीन मांडणी केली. त्याच्या  `The Origin of the Work of Art’  ह्या निबंधातला कला म्हणजे कोणी एक वस्तू नसून एक प्रकारचं `unconcealing’  – एका प्रकारच्या असतेपण/ नसतेपण उघडकीस

आणण्याची/ प्रगट करण्याची रीत म्हणून पाहिला पाहिजे असा आग्रह धरला. हे प्रगटीकरण एकाद व्यक्तीचं नसून मानवी असण्याचा विंâवा असतेपणाचंच Being) प्रगटीकरण (unconcealing) आहे. त्याच्या मते आजचे सौंदर्यशास्त्र असतेपणाच्या आधिभौतिक किंवा Metaphysical धारणांवर आधारित आहे. आजच्या सौंदर्यशास्त्रात कला म्हणजे एक वस्तू आहे आणि म्हणून तिची विक्री किंवा तिला उपभोगाची वस्तू मात्र आहे अशी समज रूढ आहे.

`The Questions concerning Technology’ ह्या निबंधात तो म्हणतो की, `टेक्नॉलॉजिकल’ आणि ‘टेक्नॉलॉजी’ ह्या भिन्न गोष्टी आहेत. टेक्नॉलॉजिकल म्हणजे कोणालाही -मग स्वत:ला असो किंवा अन्य काही– अवजारं समजण्याची वृत्ती किंवा एक असतेपणाची रीत (a way of being) आहे ज्यात सर्व प्रकृती-निसर्ग आपल्या उपयोगासाठी, वापरण्यासाठीच निर्माण झाला आहे अशी धारणा रूढ झालेली दिसते. म्हणूनच आपण स्वत:ला आणि दुसर्‍यानासुद्धा `resource’ वापरण्याची वस्तू म्हणून पाहातो. कलेविषयीची मूलभूत धारणाच मेटॅफिसिकल आणि टेक्नॉलॉजिकल आहे आणि म्हणूनच कला हे बाजारपेठच्या डायनॅमिक्समध्ये अडकते. आज कलेला मूल्य (value) नसून केवळ `किंमत’ ((price) उरलाय असं म्हणता येईल. रंजनवादी साहित्याचे कारखाने मोठ्या प्रमाणात चालतात ह्याचे हेच कारण. साहित्याचे किंवा कलेचे काम निव्वळ करमणूक आणि रंजन करून प्रतिष्ठा आणि पैसे मिळवणे हेच उरले आहे. उच्च कला आणि लोकप्रिय कला ह्यांच्यातल्या उतरंडीला आणि द्वैताला उत्तर-आधुनिकतावादी कलावंतांनी आवाहन दिलं खरं पण आज लोकप्रिय कला ही एकमात्र कला म्हणून उरलीये काय, असा प्रश्न पडतो.

३. समकालीन असणे म्हणजे आपणांस काय अभिप्रेत आहे?

४. साहित्य ज्या भूमीतून जन्म घेते, ती भूमी अथवा प्रदेश साहित्याचे सांस्कृतिक किंवा राष्ट्रीय संदर्भभान ठरवत नाही असे म्हटले जाते. काय वाटते आपल्याला?

५. तुमच्या कवितेचा उत्तरकालीन कवींवर जो गडद प्रभाव आढळतो त्याविषयी तुम्हाला काय वाटते. या महानगरी/ जागतिकीकरणोत्तरी कवितेचा प्रभाव केवळ कवितेवरच नाही तर horizontally समकालीन चित्रपट, नाटक, लघुपट, कथा-कादंब‍र्‍या इत्यादींवरही पडलेला आढळतो याविषयी तुम्हाला काय वाटते? 

६. कविता लिहिण्यासाठी अभ्यास गरजेचा असतो का? कवीने कविता लिहिण्याआधी कशाकशाचा अभ्यास करणे गरजेचे असते?

सचिन चंद्रकांत केतकर

समकालीन समाजात विंâवा डिजिटल भांडवलशाहीच्या युगात, finance capitalism, cryptocurrency आणि NFT च्या युगात, ज्याला Andreas Hepp Deep Mediatizatized समाज म्हणतो, त्यात गंभीर कला आणि कवितेचे भविष्य काय ह्याचा गंभीरपणे पुनर्विचार करण्याची गरज आहे. हा पुनर्विचार करण्याचा प्रयत्न जो साहित्यिक करतो तो समकालीन साहित्यिक असं समजत येईल. आपण जेव्हा सत्योत्तर समाज म्हणतो तेव्हा आपण सत्याचा कोणत्या सुवर्ण युगाची कल्पना करत नसतो पण ह्या deep mediatized जगातल्या डिजिटली transformed public sphere विषयी बोलत असतो.

Andreas Hepp म्हणतो की, ‘an advanced stage of the process in which all elements of our social world are intricately related to digital media and underlying
infrastructures’ आपल्या वास्तविकतेलाच बदलते. ह्या नव्या mediated construction of
reality भान समकालीन जाणिवेचा गाभा आहे असं मला वाटतं आणि ज्या साहित्यात ही जाणीव व्यक्त होते त्या साहित्याला समकालीन म्हणता येईल.

मार्शल मॅकलुहानने बर्‍याच दशकांपूर्वीच आपल्या जगाचं टीव्ही आणि रेडिओसारख्या प्रसारमाध्यमांमुळे `वैश्विक खेडं’ निर्माण झाले आहे असं जाहीर करून ठेवलंय. माध्यमांमुळे माणसाच्या इंद्रियांनुभूतीचे प्रमाण (sense ratio) सतत बदलत असतो असं मॅकलुहान म्हणतो. ज्या माध्यमांमध्ये इंद्रियानुभूती कमी प्रमाणात मिळते व प्रेक्षक विंâवा वाचकांना अधिक सर्जनशीलपणे/ कल्पकपणे सहभाग करावा लागतो अशा (Low definition) माध्यमांना मॅकलुहान `थंड’ किंवा Cool माध्यम म्हणतो (उदाहरणार्थ गंभीर साहित्य व तत्वज्ञान) आणि ज्या माध्यमात इंद्रियांनुभूती मोठ्या प्रमाणात (high definition) मिळते आणि प्रेक्षक/श्रोत्यांच्या सहभाग कमी असतो त्यांना `Hot’ किंवा उष्ण मीडिया म्हणतो (उदाहरणार्थ OTT, इन्स्टाग्राम आणि टिकटॉक). (कॉम्प्युटर games ह्या दोन्ही प्रकारचे माध्यम वाटते!) आज डिजिटल भांडवलशाही व deep mediatized जगात Hot माध्यमाचं प्रमाण खूप वाढल्यामुळे आपण एक नव्या निरक्षरतेकडे जातोय असं वाटतं. गंभीर साहित्याचे अवकाश खूप छोटं झाल्यासारखं वाटतं. अर्थातच अतिशय क्षीण झालेला `attention span’ ह्याच ई-विश्वाचा भाग आहे.

ह्या तांत्रिक क्रांतीबरोबरच वैश्विक व स्थानिक स्थरावर मोठ्या प्रमाणात वैचारिक व मूल्यनिष्ठ परिवर्तन मागच्या तीन दशकांत घडून आले आहेत. सोव्हिएत गणराज्य विलीन होणं, चीन साम्यवादाच्या नावाखाली सवाई भांडलवलशाही महासत्ता म्हणून समोर येणं, नवं उदारमतवादी विचारधारेचं जागतिकीकरण होणं वगैरे बरोबर उपभोगतावादी संस्कृतीचा जागतिकीकरण होणं वगैरे. भारतात ह्याचबरोबर जात वर्ग लिंग वगैरेचं राजकारणसुद्धा मोठ्या प्रमाणात बदललेलं दिसतं.

एकोणीसशे साठ नंतर पुढे आलेल्या अस्मितावादी चळवळी अल्पसंख्याकांच्या होत्या -दलित, आदिवासी, स्त्रिया वगैरेंच्या होत्या. एकोणीसशे नव्वदनंतर बहुसंख्याकांनी अस्मितावादी राजकारण आणि आंदोलनं सुरू केली -अयोध्या राम मंदिर आंदोलन व `straight pride’ वगैरे. औद्योगिक भांडवलशाही व्यवस्था financial capitalism आणि service sector भांडवलशाहीमुळे बाजूला पडत गेली आणि मजूर चळवळीचा पाया असलेला डावा माक्र्सवादी विचारही बाजूला पडला. कट्टर बहुसंख्याक प्रभुत्ववाद/ धुरीणत्व (majoritarian supremacist) प्रचंड प्रमाणात वाढला.

आजच geopolitics शीत युद्धोत्तर आहे. Ukraine वर रशियाचं आक्रमण, रशिया, चीन व पाकिस्तानसारख्या देशांची जवळीक वगैरे नवे संघर्ष कोणत्या तरी ideology (डाव्या उजव्या वगैरे) वर आधारित नसून निव्वळ `will to power’वर आधारित आहे. ह्या नव्या विश्वात गंभीर कवितेला काय स्थान आहे? शी जिनपिंग, ट्रम्प, पुतिन वगैरे मंडळी कोणत्या कविता वाचतात? W H Auden म्हणतो त्याप्रमाणे `Poetry makes nothing happen’.

. समकालीन असणे म्हणजे आपणांस काय अभिप्रेत आहे.

साहित्य ज्या भूमीतून जन्मते त्या भूमीला `भाषा’ म्हणतात आणि भाषेला जसा भौगोलिक आणि प्रादेशिक संदर्भ असतो तसा ऐतिहासिक संदर्भसुद्धा असतो. `मराठी’ म्हणून ओळखली जाणारी भाषा `इंडो युरोपियन’ कुळातली भाषा आहे हे ज्ञात आहेच. म्हणजे ऐतिहासिक संदर्भात पहिलं तर मराठी मात्र प्रादेशिक भाषा नसून `इंडो युरोपिअन’ भाषांच्या भूगोलाशी आणि इतिहासाशी जुळलेली आहेच. त्याचबरोबर जागतिकीकरणामुळे व तंत्रज्ञानामुळे जागतिक आणि स्थानिक ह्या दोन्ही स्तरांवरचा नातं बदल आहे. वर सांगितलेल्या जागतिक व स्थानिक परिवर्तनाचा सखोल प्रभाव सर्वच भाषांवर अपरिहार्य आहे. ह्या नव्या भाषेतून आलेले साहित्य आपलं समकालीन साहित्य समजू शकतो

तुझा प्रश्न आहे की, आपल्या कवितेचा प्रभाव इतर स्वरूप विंâवा लेखकांवर दिसतो का. तर तो दिसणे अपरिहार्य आहे, कारण आपण ज्या भाषिक व सांस्कृतिक वातावरणातून आलो तशाच वातावरणातून इतर लेखकही आलेच.

पण त्याचबरोबर हे सांगणंही गरजेचं आहे की वर्तमान आणि भूतकाळामधली discontinuity व ह्या discontinuity चे भान आधुनिकतेचे लक्षण आहे व making it new साठी अपरिहार्य आहेत. ह्या शिवाय little magazine असू शकत नाहीत आणि अवांत-गार्ड असू शकत नाही म्हणून वर्तमान समजायला भूतकाळ समजणे अपरिहार्य आहे. समकालीन विश्वाचं भान, वर्तमानाचा भान, ऐतिहासिक भान (ज्याला टी एस इलियट historical
sense म्हणतो जे पंचवीस वर्षांच्या नंतर ही कविता लिहिणे सुरू ठेवणार्‍या कोणत्याही गंभीर कवीसाठी गरजेचे आहे’), डोळसपणा व समज दुर्मीळ गोष्टी आहेत आणि Eliot म्हणतो त्याप्रमाणे कष्टाने प्राप्त करण्याची गोष्ट आहे.

त्यासाठी व्यासंग, वाचन, चिंतन आणि गांभीर्य अनिवार्य आहे जे कमीच दिसतं. हाच कवितेसाठीचा अभ्यास. आणि जर आपण कवितेला एक कला स्वरूप किंवा खेळ (sport/
game) समजत असू तर रियाझ आणि सरावाशिवाय पर्याय नाही.

मराठी माणूस वर्तमानापेक्षा किंवा भविष्यापेक्षा भूतकाळात जास्त रमतो, हा एका प्रकारचा पलायनवादच असावा. मराठी राजकारण जात आणि भूतकाळाभोवती फिरत असतं. म्हणून मराठी कवितेच्या भविष्याबद्दल एकूण संस्कृतीबद्दल विचारही आपल्या पिढीने करावा असं वाटतं.

Yurij Lotman म्हणतो तसं सांस्कृतिक बदलाच्या प्रक्रिया दोन प्रकारच्या असतात. एक प्रेडिक्टबली व संथपणे आणि explosively म्हणजे अचानकपणे अनप्रेडिक्टबली त्यात बदल होत जातात. लेखकांनी डोळसपणे ह्या दोन्ही प्रक्रियांवर लक्ष ठेवले पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळं (artificial intelligence) आपलं भविष्य पूर्ण बदलेल. Yuval Noah Harari म्हणतो त्याप्रमाणे ज्या प्रकारे मोटारीचा शोध लागल्यामुळे घोडा व बैल निरुपयोगी होत गेला तसा माणूस AI मुळे बिनकामी होत जाऊ शकतो. तंत्रज्ञानमुळे posthuman व cyborg वास्तव जन्माला येऊ घातलाय. Metaverse सारख्या VRआणि AR तंत्रज्ञानामुळे माणसा-माणसांतली नाती पूर्णपणे बदलू शकतात. जगात कुठेही राहणारा मराठी माणूस META वरून कविता संमेलनात real time मध्ये सहभागी होऊ शकेल -अर्थातच असल्या गोष्टीना काही अर्थ उरला असला तर. Nanotechnology व genetics मुळे आपल्या शरीराशीच आपलं नातं पूर्णपैकी बदलेल. ह्या भविष्यात मराठी भाषा, संस्कृती आणि कवितेचे स्थान काय असेल? अर्थातच `भविष्य’ मूलभूतपणे `unpredictable’ असतं. कोणी अडीच वर्षांपूर्वी कल्पना केली होती की करोनासारखी महामारी जगाची वाट लावेल? ह्या महामारीने माणसाच्या `precarity”च दर्शन घडवलं. पुढे climate changeमुळे आणखीन कोणती गंडांतरं बघावी लागतील हा ही प्रश्न आहेच. एक कवी म्हणून, लेखक म्हणून हे विचार मला नेहमीच पडतात आणि कोणतं समाधानकारक उत्तरही आपल्याकडे नसतं.

७. जागतिक दर्जाचे साहित्य म्हणजे काय? काय आहेत त्याचे निकष? मराठीत कोणते लेखक/कवी जागतिक दर्जाचे आहेत?

सचिन चंद्रकांत केतकर: 

आज साहित्य वैश्विक बाजारपेठेचा भाग झाला आहे, ज्याला पास्कल केसनोवासारख्या विदुषी `World Republic of Letters’ म्हणते. ही व्यवस्था अर्थातच असमान आहे कारण पाश्चात्त्य साहित्य व संस्कृती तिच्या वेंâद्रात राहते व इतर साहित्य म्हणजे मराठी, मल्याळम वगैरे ह्या जागतिक व्यवस्थेच्या परिघावरच राहतात. जागतिक दर्जा म्हणजे काय बरेच वेळेला ही बाजारपेठ ठरवत असते. ही जागतिक बाजारपेठ स्थानिक/ राष्ट्रीय बाजारपेठेबरोबर नेहमीच आदानप्रदान करत असते. हे आदानप्रदान अनेक प्रकारचे असू शकते, उदाहरणार्थ भाषांतर, अन्य भाषेतल्या कृतींविषयी परिचयात्मक लेखन व समीक्षा, जागतिक पुरस्कार (नोबेल, बुकर, पुलित्झर वगैरे).

आज जर जागतिक दर्जा म्हणजे काय, हा प्रश्न मांडायचा असेल तर ह्या संदर्भातच मांडावा लागेल.

जागतिक साहित्य व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची विसाव्या शतकातली नावं कोणती आहेत?

त्यांच्या लेखनावर नजर फिरवली तर जागतिक दर्जाविषयी थोडी कल्पना येऊ शकेल :

दोस्तोव्हस्की, टॉल्स्टॉय, गोगोल, चेखोवसारखे थोडे पूर्वीचे रशियन लेखक, काफ्का, जॉईस, हेमिंग्वे, इलियट, फॉकनर, टोनी मोरिसॉन, मांडलस्तम, आख्मॅटोवा स्टीवन्स, जीन्सबर्ग, टेड ह्यूज, सिल्विया प्लाथ, विस्लीव्ह झिमबोरसका, मिलोझ, वास्को पोपा, आल्बेर काम्यू, ज्या पॉल सात्र्र, बर्नार्ड शॉ, इब्सेन, ब्रेश्ट, बेकेट, इटलो वॅâल्विनो, मिलान कुंदेरा, त्याचबरोबर गब्रीएल गार्सिया मार्खेस, होरचे लुईस बोर्हेझ, ऑक्टव्हिओ पाझ, मारिओ वर्गास लॉससा व पाब्लो नेरुदा सारखे दक्षिण अमेरिकी लेखक आज जागतिक बाजारपेठेत महत्त्वाचे मानले जातात, कारण त्यांचे उत्तमोत्तम अनुवाद व त्यांना नोबेलसारखे जागतिक पुरस्कारही मिळाले आहेत.

ह्या व्यवस्थेचा स्वत:च राजकारण असलं तरी ह्या लेखकांनी मात्र स्वत:च्या भाषेतलाच नव्हे जगातल्या इतर भाषेतला साहित्याला – मराठीसकट – घडवलं आहे हे कबूल करावं लागेल.

ह्यांच्यामधली समान सूत्रं कोणती आहेत?

आशय आणि अभिव्यक्ती ह्या दोन्ही बाबींमध्ये कल्पकता व वेगळेपणा.

जवळजवळ सर्वांनीच फॉर्म आणि आधुनिक जीवनदृष्ट्या सखोल तात्त्विक असं वेगळं काही दिलं आहे व ग्राऊंड ब्रेविंâग काम केलं आहे.

देशीवादाची अवास्तविक कल्पना बारगळल्यामुळे मराठी साहित्य अतिशय संकुचित झालं होतं त्याचबरोबर मराठीत पारंपरिक, सरधोपट, फॉम्र्युलावादी लेखन करण्याच्या वृत्त्ती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वैश्विक दर्जाचं लेखन दुर्मीळ आहे.

त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात मराठी वाचकसुद्धा भूतकाळग्रस्त, लेखांसारखाच जातीवादी, संकुचित दृष्टी असलेला व बुळबुळीत लेखन वाचणारा असल्यामुळे वैश्विक दर्जाचा मराठी लेखनाकडे पाठ फिरवताना दिसतो.

तरीही मराठीत अरुण कोलटकर, बाबुराव बागुल, नामदेव ढसाळ, सदानंद रेगे, दिलीप चित्रे, वसंत डहाके, व्यंकटेश माडगूळकर, कमल देसाई, पानवलकर, आनंद विनायक जातेगावकर, ह. मो. मराठे, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर, विलास सारंग, चंद्रकांत खोत, वसंत गुर्जर, गंगाधर गाडगीळ, शाम मनोहर, मलिका अमर शेख, जी ए कुलकर्णी, कोसलाकार नेमाडे, किरण नगरकर, नंदा खरे वगैरेंनी विश्वसाहित्य पचवून स्वत:चं स्वतंत्र साहित्य मराठीत दिलं आहे. आजच्या पिढीत मकरंद साठे, अनिल दामले, संजीव खांडेकर, हेमंत दिवटे, कविता महाजन, निवि कुलकर्णी, सलील वाघ, मन्या जोशी, दिनकर मनवर, कथाकार प्रज्ञा दया पवार, मंगेश नारायणराव काळे ही परंपरा पुढे नेत आहेत हे पाहून आनंद होतो.

परंतु हे सगळं साहित्य वैश्विक प्लॅटफॉर्मवर जायला हवं इतकं जात नाही म्हणून  माझ्याकडून जितका प्रयत्न होऊ शकतो तितका करतो. असे अनेक प्रयत्न इतरांनीही केले पाहिजेत. त्याचबरोबर मराठीतही हे लेखन केंद्रस्थानी असावं असं वाटतं.

 ८. कविता निर्मितीची प्रकिया उलगडून दाखविता येते काय?

सचिन चंद्रकांत केतकर

माझ्यापुरती काही प्रमाणात माझी रचनाप्रक्रिया उलगडून दाखवण्याचा प्रयत्न मी करू शकतो.

माझ्या कवितेवर surrealism, imagism ke expressionism वगैरे Poetics चा प्रभाव आहे. मी कविता ठरवून logically वगैरे लिहू शकत नाही. एक प्रतिमा किंवा कल्पनेच्या साहचर्येचे association अनेक धागे अनेक दिशेने उलगडत जातात त्यांचा मागोवा मी कवितेतून घेतो. हे धागे नेणिवेतून सुरू होतात जाणिवेत शिरून पुन्हा नेणिवेत पसरतात. म्हणून माझी कविता कशी होईल किंवा त्यातून मला कोणती गोष्ट मांडायची आहे हे अगोदरपासून माहीत नसतं. आणि अगोदरपासून ठरवून लिहिलेल्या कवितेचा मला स्वत:ला कंटाळा येतो. म्हणून ठरावीक विषयांवर ठरावीक पद्धतीनं लिहिलेली कविता मला आवडत नाही. `चादर पाहून पसरले मी माझे पंचावन्न पाय’ ह्या ओळीचा अर्थ मला ठाऊक नसतो, पण माझ्या नेणिवेत त्याला काहीएक अर्थ असतो आणि कवितेतून मी त्याला शोधत असतो. अचेतन/ चेतन साहचार्याची माझी प्रक्रिया कुठे जाईल हे मलाच माहीत नसतं. म्हणून माझ्या कविता काही जणांना दुर्बोध वाटतात. पण कविता उमजणे म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न राहतोच. कविता उमजणे म्हणजे गद्य -वर्तमानपत्र किंवा ठरावीक संभाषण- उमजणे असाच अर्थ असला तर कोणी कवितेच्या फंदातच का पडतोय, हा प्रश्न उरतो. ह्या दुर्बोध कवितेची परंपरा निदान सदानंद रेगे, मर्ढेकर, कोलटकर, चित्रे, परब, ओक, ढसाळ, डहाके व सारंग वगैरे कवींमध्ये सापडते (ह्या पिढीच्या कवितेला मराठी काव्य समीक्षेनी कितपत न्याय दिला? मला वाटतं फारच कमी प्रमाणात ह्या कवितेचं चांगलं विश्लेषण सापडतं. हे जर खरं आहे तर आपल्या पिढीच्या कवितेला आजची मराठी काव्य समीक्षा कितपत न्याय देऊ शकणार आहे?).

आपल्या जाणिवेवर नेणिवेवर व आपल्या भाषेवर अगोदर मी वर सांगितलेल्या सामाजिक-सांस्कृतिक व राजकीय प्रक्रियांचा प्रभाव असतोच. जर हायडेगरच `Language is the house of Being’ हे विधान पाहिलं किंवा  Jacques Lacanचं `Unconscious is structured like
language’ हे विधान पाहिलं तर आपल्या असतेपणाला व आपल्या नेणिवेला आपल्या भाषेपासून वेगळं करून पाहता येत नाही हे समजतं. म्हणून जेव्हा आपण आपली भाषा, समकालीन भाषा आज आपल्या पूर्वसूरींपेक्षा वेगळी आहे असं म्हणतो तेव्हा आपण आपलं असतेपण व नेणीव (फक्त जाणीवच नाही) सुद्धा आज बदलली आहे असं म्हणू शकतो.बहुतेक इथेच आपलं समकालीनत्व सापडेल असं वाटतं.

८. भारतात स्वातंत्र्योत्तर काळात आयआयटीसारख्या संस्थांपासून ते फिल्म इन्स्टिट्यूट, एनएसडी, साहित्य अकादमी आणि अनेक राष्ट्रीय आणि खासगी विद्यापीठे, संशोधन संस्था उभ्या राहिल्या पण कवितेकडे गांभीर्याने अभिव्यक्ती माध्यम म्हणून बघितले जाण्यासाठी अशी एकही मोठी संस्था उभी राहिली नाही. या सगळ्याविषयी आपल्याला काय वाटते?

 सचिन चंद्रकांत केतकर:

 कवितेकडे गांभीर्याने अभिव्यक्ती माध्यम म्हणून बघितले जाण्यासाठी अशी एकही मोठी संस्था उभी राहिली नाही हे खरं आहे. पण संस्था आली म्हणजे फंड्ज आले, खाती आली, राजकारण आलं. तरीही असा एखादा प्रयोग करून पाहण्यात काहीच हरकत नाही. कवितेसाठी अभ्यास, चर्चा, लेखन शिबीर, भाषांतर शिबीर, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे कवी व भाषांतरकार वगैरेंना आमंत्रित करून चर्चा, online व offline सामायिक, youtube channel वगैरे प्रवृत्ती करता येईल. तुझं कवितेचा घर ही संकल्पना किंवा पोएट्रीवाला foundation ची कल्पना ह्याच दिशेने जाते. नक्कीच असा प्रयोग करून पहिला हवा.