Home दिवाळी 2021ओपिनियन ओपिनियन-योगिनी सातारकर

ओपिनियन-योगिनी सातारकर

साहित्य या संकल्पनेचा इतिहास आणि व्याप्ती लक्षात घेतली तर साहित्य व समीक्षेचा अन्योन्य संबंध सहज स्पष्ट होतो. ग्रीक भाषेतील `व्rग्हाह’-`क्रीनेन’ या शब्दापासून तयार झालेल्या `ण्rग्ूग्म्ग्ेस्’ – `क्रिटीसिझम’ या शब्दाचा अर्थ म्हणजे एखादी गोष्ट समजून घ्यावयाची असल्यास कोणत्या गोष्टी पाहणे/ अभ्यासणे सहसंबंधी ठरते हा होय. साहित्य सिद्धांत, समीक्षा आणि इतिहास या ज्ञानशाखांचा परस्पर असणारा सहसंबंध स्पष्ट करणा‍ऱ्या रेने वेलेक यांच्या `अ हिस्टरी ऑफ मॉडर्न क्रिटीसिझम’ (१७५० -१९५०) आणि `कन्सेप्ट ऑफ क्रिटीसिझम’ (१९६३) या ग्रंथात प्रतिपादन केलेल्या समीक्षेच्या मूळ सिद्धांताशी बांधील असूनही आजची समीक्षा अनेक अर्थाने निराळी झाली आहे. डॉ. स. ग. मालशे यांनी नोंदविल्याप्रमाणे, `अशा पद्धतीच्या अभ्यासग्रंथातून आपली एवढीच खात्री पटते की, भिन्न भिन्न कालखंडातील समीक्षेच्या संकल्पना व रूढी भिन्न भिन्न स्वरूपाच्या होत्या.’ (साहित्य सिद्धांत, ३५) सम्यक आकलन हे साहित्य समीक्षेचे आद्य उद्दिष्ट राहिलेले आहे. त्यात त्या साहित्यकृतीचे अर्थग्रहण प्रथम येते त्यानंतर त्या साहित्यकृतीचे मूल्यमापन येते. साहित्यविषयक अनेक प्रश्नांची चर्चा करणे हे समीक्षेचे कार्य आहे. यासह त्या साहित्य प्रकारात निर्माण झालेल्या साहित्यकृतीत त्या साहित्याचे स्थान निश्चित करणे हेही समीक्षेचे कार्य होय.

समीक्षेचा विचार करता विसावे शतक आणि त्यातही विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अधिक तीव्रतेने अनुभवास आलेला अस्तित्ववाद, अर्थशून्यतावाद आणि उत्तरआधुनिकतावाद, संरचनावाद, स्त्रीवाद यासह उदयास आलेल्या आणि विकास पावलेल्या विविध विचारधारा यांनी मानवी जीवनव्यवहार, संस्कृती आणि साहित्य दृश्य-अदृश्य स्वरूपाने निश्चित असे प्रभावित केले. १९६०च्या दशकातील स्त्रीवादी समीक्षा आणि वाचकानुलक्ष्यी समीक्षेने समीक्षेचे आयाम बदलले. केवळ ज्ञानवेंâद्री वा तज्ञवेंâद्री असणारी समीक्षा व्यक्तिवादी स्वरूपात बदलली आणि समासात असलेल्या स्त्रीच्या अनुभवविश्वाने समीक्षेची चौकट विस्तारली. १९७० मध्ये जेंडर स्टडीज/ क्वीअर स्टडीजचे खुले झालेले क्षेत्र आणि १९८० पासून अस्तित्वात आलेले नवइतिहासवाद आणि संस्कृती अभ्यास यांचा प्रभाव लक्षणीय आहे. याशिवाय आधुनिक समीक्षेत संहितेची स्वायत्तता महत्त्वाचे मानणा‍ऱ्या नवसमीक्षेचे वर्चस्व दिसते.

विसाव्या शतकातील संकीर्ण, व्यामिश्र आणि बहुजिनसी अशा आधुनिकतावादाचे हे पुढचे स्वरूप उत्तरआधुनिकतावादाने टोकाला नेत बहुजन संस्कृतीशी निगडित प्रकारांची जवळीक साधत भिन्न भिन्न कलाशैलीच्या माध्यमांची सरमिसळ केली. जनसंपर्कवाद, ग्राहकवाद याचा वापर यामुळे पारंपरिक रूढ वाङ्मयीन चौकटीत वाङ्मयाचे वर्गीकरण करणेही अवघड झाल्याचे उदाहरणे आहेत. मागील अडीच-तीन दशकांपासून जागतिकीकरणाला वगळून आपल्याला नव्या वाङ्मयीन, सांस्कृतिक स्थित्यंतराचा विचार करता येत नाही. जगण्याची सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रे व्यापत तंत्रज्ञानाने टोकाच्या प्रभावित झालेल्या

एका नव्या संस्कृतीचा उदय जगतिकीकरणाने झाला. एक प्रकारची नवी भांडवलशाही स्थापित होत माणसाचे वस्तूकरण होण्याची क्रिया यामुळे घडून आलीय. याचा एक मोठा परिणाम भाषा, साहित्य आणि सांस्कृतिक वैविध्यावर झाला आहे, जे कोणत्याही साहित्याची निर्मिती आणि त्याची समीक्षा प्रभावित करते. सांस्कृतिक संचित, वर्तमान सांस्कृतिक वास्तव, अल्पसंख्याकाच्या संस्कृती, समाजमाध्यमे, समाजमाध्यमे निर्मित आभासी वास्तव, माध्यमांचा प्रत्यक्ष जीवनातील हस्तक्षेप, सत्तेचा अंकुश, जीवनाची व्यामिश्रता, काळाची गुंतागुंत हे सर्व घटक आणि या घटकातील परस्परावलंबी द्वंद्व आणि त्यातून निर्माण होणारी विविधता हे समकाळाचे व्यवच्छेदक लक्षण आहे जे कोणत्याही साहित्याची निर्मिती प्रभावित करते. रोला

बार्थस यांच्या मतानुसार, `प्रत्येक लेखन प्रकार हा इतिहाससापेक्ष कार्य पार पाडत असतो आणि अशा लेखन प्रकारातील घटकांना संहितेच्या पलीकडे अस्तित्वच नसते.’ (रायझिंग डिग्री झीरो, २०-२२) यानुसार विचार करता समीक्षा आणि समीक्षकाला कोणतेच अस्तित्व नाही हा विचार एका बाजूला आणि दुसरीकडे `समीक्षेशिवाय वाङ्मयव्यवहार अपूर्ण आहे.’ हा मोठ्या प्रमाणात मान्यता पावलेला विचार या दोन परस्परविरोधी मतांमध्ये समीक्षा आणि समीक्षाव्यवहार उभा आहे. अशा वेळी समीक्षा नेमकी कशी असावी? याबाबत गांभीर्याने विचार करणे क्रमप्राप्त ठरते.

समकाळाच्या पाश्र्वभूमीवर मराठी समीक्षक विविध साहित्यप्रवाह वा वाद (घ्ेस्) याआधारे साहित्याचे तुकडे करतात आणि असे करण्याची खरच गरज आहे का? याचा विचार करता साहित्य ही एक व्यापक संज्ञा आहे हे सर्वप्रथम लक्षात घेणे आवश्यक आहे. साहित्यनिर्मितीच्या प्रेरणा, धारणा आणि परिस्थिती भिन्न असली तरी (आणि काहीवेळा हेतूही विशिष्ट असला

तरीही!) हे साहित्य `साहित्य’ म्हणून एका व्यापक संज्ञेचा भाग आहे हे महत्त्वपूर्ण असते. प्रसिद्ध कवी व समीक्षक टी. एस. इलियट यांनी `ट्रडिशन अ‍ॅण्ड इंडिव्हिज्युअल टॅलेंट’ या निबंधात नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक लेखकाचे लेखक म्हणून स्वतंत्र असे एक अस्तित्व असते आणि त्याच वेळी तो लेखक हा साहित्यपरंपरा पुढे नेणारा, या परंपरेतला एक भाग- एक दुवादेखील असतो. एक लेखक म्हणून लिहीत असताना लेखक हा एक व्यक्ती व माणूस म्हणून त्या त्या काळाचे प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे त्याला वा त्याच्या लेखनाला

एकाच प्रकारात, चौकटीत सीमित करणे योग्य ठरत नाही. त्याच्या साहित्याकडे ग्रामीण, दलित वा स्त्रीवादी असा कुठलाही एक प्रकार दर्शविणारे साहित्य अशा पद्धतीने पाहिल्यास हा दृष्टिकोन संकुचित अशा स्वरूपाचा होतो आणि यामुळेच त्या कलाकृतीच्या, संहितेच्या वाचनाच्या आणि मूल्यमापनाच्या अनेकार्थी शक्यता राहात नाहीत. साहित्य हे `दजह ाह्’ वा अनेकार्थी शक्यतांसाठी खुले असावे हे संभवत नाही.

नानाविध कलावाङ्मय प्रकार, भिन्न भिन्न शैली व तंत्रकौशल्ये यांच्या अनेकविध पर्यायांची उपलब्धता आजच्या सर्जनशील लेखकांसमोर आहे. याचबरोबर त्याच्या वापराबद्दल व अस्सलतेबद्दल संदेह व अनिश्चितता आहे आणि या दोन्हींच्या परस्पर प्रक्रियेतून ह्या साहित्याची निर्मिती होत आहे. समकाळात संस्कृती संकर (ण्ल्त्ूल्raत् प्ब्ंrग््गर््ैaूग्दह), आत्मभान व विश्वभान आणि भाषा व भाषिक भान हे मुद्दे महत्त्वपूर्ण ठरले आहेत. याशिवाय साहित्याची समीक्षा करताना मांडलेले मत, लेखकाची शैली, मध्यवर्ती आशयसूत्र, वापरलेली

विविध तंत्रे यासह ते लिहिले गेलेला काळ आणि अवकाश या दोन पातळ्यांवर विचार होणे आवश्यक वाटते. व्यामिश्र व गुंतागुंतीच्या काळाचे पडसाद असणा‍ऱ्या साहित्यासाठी रूढार्थाने असणारी सौंदर्यवादी, आस्वादक वा पारंपरिक समीक्षा आणि तिचे मापदंड हे सर्वार्थाने योग्य असतीलच असे म्हणता येणार नाही. याशिवाय जागतिकीकरण आणि प्रामुख्याने डिजिटलाझेशनने शहर आणि खेडे यांच्या अवकाशाची सरमिसळ केली आहे. यामुळे संपूर्णपणे शहरी, नागरी वा ग्रामीण या अर्थानेच हे लेखन वा लेखनातील अवकाश याकडे पाहणे तितकेसे शक्य होणार नाहीय. भाषिक तुटलेपण, भाषिक सरमिसळ, अनुभवांची जटिलता, स्थलांतर,

उद्योगांचे बदलते स्वरूप, अनिश्चितता, बदललेले जाणिवांचे क्षेत्र, संपर्क साधनांची उपलब्धता

आणि परिणाम, आभासी जोडले जाणे या सर्व बाबींनी लेखकाचा आणि लेखनाचा अवकाश प्रभावित व बाधितही झाला आहे आणि अशा काळ व अवकाशाचे थेट वा अप्रत्यक्ष प्रतिबिंब उमटलेल्या लेखनाच्या समीक्षेचे एक मोठे आव्हान मराठी समीक्षेपुढे आहे.

या सर्वांचा साक्षेपी विचार करता, पारंपरिक रूढ समीक्षा, वाङ्मय प्रवाहावर आधारित समीक्षा वा वादाचा मापदंड एकारलेपणाने वापरुन केलेली समीक्षा यापैकी कोणतीही पद्धत कालसुसंगत व आशयसुसंगत नाहीय. यापेक्षा साहित्य म्हणून साकल्याने विचार करत मानवी अनुभव वेंâद्रवर्ती ठेवून एकापेक्षा अधिक वादांना अनुलक्षून त्याचा विचार करणे अधिक संयुक्तिक ठरेल. कारण एखादी साहित्यकृती ही एकाच वेळी अनेक पद्धतींनी समीक्षा करता येऊ शकेल अशा पद्धतीची असू शकते त्याचबरोबर कोणत्याही वादाचा प्रभाव नसणारी स्वतंत्र अभिव्यक्तीही असू शकते. यामुळेच बदलते सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक भवताल पाहता या समीक्षेचे स्वरूप हे सर्वसमावेशक आणि लवचीक असणे गरजेचे आहे. पर्यायाची विविधता आणि अर्थाची अनेकता असण्याच्या समकाळात वाचकांचं अर्थनिर्मितीचं स्वातंत्र्य आणि त्याचं भान हे संहितेच्या स्वायत्ततेइतवंâच महत्त्वपूर्ण आहे हे मान्य करायला हवं. अर्थात हे म्हणताना इथे समीक्षेचा अर्थ हा अनुशासकीय पद्धतीची समीक्षा असा आहे. सैद्धांतिक व्यूह व तत्त्वे याचा वापर करणे, प्रसंगी गरजेनुसार नवे सिद्धांत मांडणे वा मांडले जाणारे सिद्धांत अवलंबिणे हे घडायला हवे. उदा.: आधुनिकतावाद व उत्तरआधुनिकतावाद यातून उदयास येणारा `मेटामॉडर्नीझम’ हा नवा वाद म्हणता येईल. समीक्षाशास्त्राचा अभ्यास करून या विखंडित वास्तवाला शब्दबद्ध करणा‍ऱ्या साहित्याची अनुशासित अशी समीक्षा करणे गरजेचे आहे. ही समीक्षा करताना साहित्यकृतीचा रूपबंध, आकृतिबंध, भाषा, आशयद्रव्याचे स्वरूप, लेखक यासह समाज व संस्कृतीशी असणारे साहित्यकृतींचे संबंध समीक्षेने लक्षात घ्यावयास हवे. यासह अभिव्यक्तीचे वेगळेपण, प्रयोगशीलता, बदलती पिढी व पिढीतील अंतर,

लेखनाची समकालीनता, विचारांचे निराळेपण आणि असे असूनही कोणत्याही चौकटीशिवाय वा पूर्वग्रहाशिवाय या साहित्याकडे समीक्षेने पाहणे आवश्यक वाटते. नव्याने येऊ पाहणा‍ऱ्या वा त्या अनुषंगाने काही एक मांडणी केलेल्या वाद वा विचारधारांना पडताळून पाहण्याची गरज अधोरेखित करावी वाटते. या संदर्भाने `संस्कृती संकर’ ही एक अटळ आणि न नाकारता येणारी गोष्ट आहे हे लक्षात घ्यायला हवे. मर्यादा असणारा केवळ एकजिनसी असा वाद अंगीकारल्यास रसनिर्मितीच्या प्रेरणा आणि आस्थेच्या गुंतवणुकीवर मर्यादा येतीलच याशिवाय तथ्यनिष्ठ, तर्कशुद्ध पद्धतीने समीक्षाही शक्य होणार नाही.

मराठी समीक्षेचा विचार करता सर्जकता, आस्था, परंपरांचे नूतनीकरण, पाश्चिमात्य-युरोपीय – भारतीय या संस्कृतींचा एकत्रित विचार मानवी संस्कृती म्हणून होणे आवश्यक दिसते, ज्यात प्रत्येक संस्कृतीचे व अभिव्यक्तीचे वेगळे अस्तित्व आहेच परंतु जागतिकीकरणाच्या रेट्यात, गतीत याचा एकत्रित चेहरा काय दर्शवतो? हे अभ्यासणे गरजेचे आहे. विचारशून्य, अर्थशून्य कृती प्रबळ ठरण्याच्या या काळात समीक्षेने संदर्भाचे नि:संदर्भीकरण आणि पुन:संदर्भीकरणाच्या प्रक्रियेचे महत्त्व लक्षात घेऊन आस्थेच्या नव्या क्षेत्राचा शोध घेणे व तो शोध एकांगीपणाने न घेता सर्वसमावेशक पद्धतीने घेणे गरजेचे आहे. मराठी समीक्षेने हे वास्तव लक्षात घेऊन कोणत्याही वादाप्रति वा वादाविरोधातील टोकाची भूमिका वा आग्रह टाळून साहित्याचा विचार वास्तवाधिष्ठित व संतुलित पद्धतीने करून समीक्षा करायला

हवी, कारण काळ आणि धारणा कितीही बदलल्या तरीही त्या आव्हांनाना सामोरे जात साहित्यकृतींचे अर्थनिर्णयन व मूल्यमापन हे समीक्षेचे कार्य आणि वाचक व लेखक यांच्यातील एक दुवा व निरपेक्ष मूल्यमापक म्हणून असणारी समीक्षकाची भूमिका याबाबत शंका नाहीय हे तर निर्विवाद!

मो. ९८८१७१७०२७.