Home August 2022 आवडलेली कविता – पी. विठ्ठल

आवडलेली कविता – पी. विठ्ठल

अनटायटल्ड

कधीतरी विचारतेस

किती प्रेमहे माझं तुझ्यावर

मी खरंच सांगतो जेव्हढं

आहे ना माझं माझ्यावर तेव्हढंच

आहे तुझ्यावरही

नाराज होतेस

तुझ्यावर माझं माझ्यापेक्षा जास्त हवं असतं

तुला प्रेम

तुला आयुष्य फिक्शनमध्ये जगायचं असतं

मला कवितेत

बस इतकाच तर फरक आहे

आपल्या प्रेमात

(पॅरानोया, पृ. ६०)

      

नव्वदोत्तर पिढीतील महत्त्वाचे महानगरी कवी अशी हेमंत दिवटे यांची ओळख आहे. उत्तर आधुनिक संवेदनशीलतेची वेगळी कविता लिहिणार्‍या या कवीचे एकूण पाच कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. अनिश्चित आणि सर्वार्थाने नव्या अशा आधुनिक काळाचा उपहास आणि चिकित्सा करणारी कविता त्यांनी लिहिली. माणसांच्या जगण्यातले सार्वत्रिक पेच त्यांची कविता मांडते आणि वाचकांच्या मनोवस्थेला अंतर्बाह्य धक्का देते. समकाळाचा म्हणजे माहितीयुगाचा आणि या काळात जगणाNया माणसांच्या मन:स्थितीचा आत्यंतिक संवेदनशीलतेने, नव्या भाषेत वेध घेते. विशेषत: नव्वदोत्तर काळाने निर्माण केलेल्या सामाजिक, सांस्कृतिक चौकटींचा आणि भौतिक स्थैर्य मिळालेल्या, पण मानसिक स्वास्थ्य गमावलेल्या माणसांच्या परात्म जगण्याच्या नोंदी अत्यंत भेदकतेने या कवीने घेतल्या आहेत. हेमंत दिवटे यांची कविता भाषेचे, आकृतिबंधांचे रूढ संकेत किंवा सौंदर्यशास्त्र नाकारते आणि विविध वैचारिक धारणांमधून अथवा प्रक्रियेतून उदयाला आलेल्या संभ्रमित कोलाहलाचे व्यापक चित्रण करते. पारंपरिक मूल्यव्यवस्था आणि समकालीन वास्तव यांच्यातील दृश्य-अदृश्य संघर्ष अत्यंत प्रतीकात्मकरीत्या त्यांनी कवितेतून मांडला आहे. जागतिकीकरणाच्या पाश्र्वभूमीवर ही कविता समाजरचनेचे, परिवर्तनाचे भावनिक, मानसिक घालमेलीचे  एक मॉडेल सामोर ठेवते. या मॉडेलमध्ये भाषा, संस्कृती, माणसांचा वर्तन व्यवहार आणि नवतंत्रज्ञानाने अंकित केलेल्या

भोवतालाचा एक व्यापक अंश एकवटलेला आहे. अनुभव आणि आशयाचे बहुविध पदर हे हेमंतच्या कवितेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. समकालीन सांस्कृतिक प्रश्नांसह विविध अस्मितावेंâद्री राजकारणाचा, पर्यावरणाचा आणि पोस्ट मॉडर्न अवकाशाचा आस्थेने विचार करणारा महानगरी कवी अशी त्यांची ओळख आहे. अशी ओळख असण्याच्या पाश्र्वभूमीवर त्यांच्या `अनटायटल्ड’ या कवितेचा `मला आवडलेली चांगली कविता’ म्हणून विचार करायचा आहे.

अर्थात आपल्याला एखादी कविता का आवडली? याचे तार्किक उत्तर देता येईलच असे नसते. कारण कविता आवडण्याचा एकच एक निकष नसतो. कविता हे एक प्रतीकात्मक सर्जन असते. हे सर्जन व्यक्तिगत भावभावनांचेच नव्हे तर व्यापक अर्थाने ते भाषा आणि संस्कृतीचेही सर्जन असते. याचा अर्थ कविता ही खूप उपयुक्त अशी सामाजिक गोष्ट असते का? तर तसेही म्हणता येणार नाही. पण चांगली कविता एक भावनात्मक संघटन असते आणि तिचे अंतस्थ अवकाश प्रत्ययकारी असते. महत्त्वाचे म्हणजे तिच्यात सामाजिक आत्मभानाचाही एक कप्पा असतोच. शाश्वत मूल्येही असतात. ही मूल्येच त्या कवितेची महत्ता सिद्ध करत असतात. हेमंतची `अनटायटल्ड’ ही कविता कोणतीही बौद्धिक चिकित्सा करत नाही. या कवितेतील भावनात्मक अनुभव महत्त्वाचा आहे. नात्यांच्या परस्परसंबंधाचे रूढ व्याकरण आणि बदलती जीवनशैली लक्षात घेतली की या कवितेचा अर्थ सहजपणे उलगडतो. `अनटायटल्ड’ ही कविता बारा ओळी आणि तीन कडव्यात विभागलेली आहे. एवूâण एक्केचाळीस शब्दांच्या या रचनेत शीर्षकाशिवाय `फिक्शन’ हा एक इंग्रजी शब्द आहे. म्हणजे `अनटायटल्ड’ आणि `फिक्शन’ या दोन शब्दांशिवाय आलेले इतर शब्द हे आपल्या नेहमीच्या संवादातले आहेत. या कवितेत कोणतेही शब्द जाणीवपूर्वक योजलेले आहेत, असे दिसत नाही. महत्त्वाचे म्हणजे ही कविता अल्पाक्षरी आहे. ती कोणतेही रूपक घडवत नाही. अनुभव शेअर करत नाही. कोणत्याही मूल्यांचे संदर्भ देत नाही. आध्यात्मिक भाष्य करत नाही. जे आहे ते थेट आणि सरळ. पण तरीही ही कविता कमालीचा अर्थ प्रकट करते. ही अर्थपूर्णता तिला कशी लाभली? हा मुद्दा विचारात घ्यायला हवा.

‘कधीतरी विचारतेस/ किती प्रेमहे माझं तुझ्यावर’ या कवितेच्या पहिल्या दोन ओळी. भिन्न लिंगी व्यक्तीने त्याच्याशी म्हणजे कवितागत `मी’शी साधलेला हा संवाद आहे. ही व्यक्ती कुणीही असू शकते. पत्नी, मैत्रीण अथवा प्रेयसी. ती यापैकी नेमकी कोण आहे? हे यातून सूचित होत नाही, पण ती `त्याच्या’ अधिक जवळची व्यक्ती आहे, हे मात्र नक्की. `किती प्रेमहे माझं तुझ्यावर’ या तिने विचारलेल्या प्रश्नाला `मी खरंच सांगतो जेव्हढं / आहे ना माझं माझ्यावर तेव्हढंच/ आहे तुझ्यावरही’ असं तो सांगतो. `प्रेमहे’, `जेव्हढं’, `तेव्हढं’ हे प्रमाणभाषेतील शब्द नाहीत. पण तरीही या शब्दांची योजना कवीने जाणीवपूर्वक केली

आहे. कारण आपण आपल्या आत्मीय व्यक्तीशी बोलताना कधीही भाषेची प्रमाणसंहिता पाळत नसतो. उलट वरील शब्दातून आपलेपणा, जिव्हाळा अधिक उत्कटतेणे व्यक्त होताना दिसतो. प्रमाणभाषेची अतिसभ्य औपचारिकता पूर्ण करण्याची गरज इथे कवीला वाटत नाही. कारण तो `ती’च्या भावविश्वाच्या अधिक जवळ आहे. विंâबहुना ती त्याला खूप प्रिय आहे. रूढार्थाने या पाच ओळी म्हणजे दोघांतील गद्य बोलणे असले तरी `तिच्या’ भावस्थितीचा अंदाज वाचक म्हणून आपल्याला येतो. मुळात `किती प्रेमहे माझं तुझ्यावर’ ही कवितेतील ओळ असली तरी तिने त्याला विचारलेला मूळ प्रश्न `किती प्रेमहे तुझं माझ्यावर?’ असा असावा. तिने विचारलेल्या प्रश्नाला कवी स्वत:शी जोडून घेत उतर देतो. दोघांच्या निकोप नात्यात काही अंतर पडलेय का? नात्याविषयीची असुरक्षितता तिला जाणवली म्हणून तिने हा प्रश्न विचारला असेल का?

‘मी खरंच सांगतो जेव्हढं/ आहे ना माझं माझ्यावर तेव्हढंच/ आहे तुझ्यावरही’ असं तो उत्तर देतो; पण पुढच्याच कडव्यात `नाराज होतेस/ तुझ्यावर माझं माझ्यापेक्षा जास्त हवं असतं/ तुला प्रेम’ अशी भावना त्याच्या मनातील सूक्ष्म अस्वस्थता प्रकट करते. या कवितेत दोघांच्या नात्यातील विंâवा परस्परांविषयीची आत्मीय महत्त्वाकांक्षा पाहायला मिळते. गैरसमजांचे, अपेक्षांचे एक द्वैत इथे पाहायला मिळते. तिच्या मनातील अनामिक भय आणि तिला त्याच्याकडून हवे असलेले अधिकचे प्रेम – यातून उद्भवलेल्या दोघांच्या मनोवस्थेचं दर्शन आपल्याला घडतं. हा संवाद रोमँटिक म्हणावा असा नाही. एकमेकांच्या मनातला संभ्रम इथे आहे. अर्थात हा संभ्रम स्पष्टपणे दिसत नाही. पण त्याची जाणीव मात्र आपल्याला

होते. `तुला आयुष्य फिक्शनमध्ये जगायचं असतं/ मला कवितेत/ बस इतकाच तर फरक आहे/ आपल्या प्रेमात’ असं तो म्हणतो. पण त्याच्या या व्यक्त होण्यातून दोघातील आंतरिक, मानसिक संघर्ष सामोर येतो. हा संघर्ष भावनिक दुरावलेपणाचा आणि दोघांच्या विचार करण्याच्या पद्धतीचा देखील आहे. तो बोलून मोकळा होतो, पण तिची बाजू मात्र इथे समजायला मार्ग नाही. `फिक्शन’मध्ये जगणं आणि कवितेत जगणं यात फरक नक्कीच आहे. पण तरीही दोन्हांrत खूप भिन्नता असते, असे नाही. कविता ही वास्तवाच्या खूप जवळ असते आणि कल्पित हे भासमय, चेहराविहीन असते याचे सूचन या ओळीतून होते. त्याचे `कवितेशी’ आणि तिचे `कल्पिताशी’ असलेले नातेच दोघांमधील मतभेदाचा मुद्दा आहे. दोघांचेही परस्परांवर खूप प्रेम असले तरी एक अदृश्य रेषा दोघांच्यामध्ये आहेच. विलक्षण ताकदीने आणि कमीत कमी शब्दातून नात्यातील मानसिक द्वंद्व कवी या कवितेतून मांडतो. विशेष म्हणजे या कवितेत कोणत्याही प्रतिमा नाहीत. भाषिक मोडतोड नाही. विरामचिन्हे नाहीत. अगदी सहज साधा संवाद आहे. पण हा संवाद आधी म्हटल्याप्रमाणे खूप अर्थपूर्ण आणि प्रतीकात्मक आहे. एक भावसंपन्न अनुभव ही कविता देते.

ही कविता मला का आवडली? तर ही कविता कोणतेही गद्य तपशील सामोर ठेवत नाही. कवी महानगरी असल्यामुळे अशी शक्यता गृहीत धरता येते, पण इथे तसे घडलेले नाही. प्रतिमा आणि भाषेचे कोणतेच अवडंबर नाही. तात्त्विक उपदेशही इथे नाही. वाचकांच्या आकलन क्षमतेला ती ताण देत नाही. थोडक्यात ती दुर्बोध या कॅटेगिरीत येत नाही. अर्थात म्हणून ही कविता चांगली ठरते का? तर नाही. ही कविता वाचकांच्या मनातील गृहीत तार्किकतेला पूर्णपणे छेद देते. आणि एका प्रगल्भ, समंजस शब्दातून/ संवादातून नात्याच्या निकोपतेचा रस्ता प्रशस्त करते. विशेषत: आजच्या अधिक गद्य कींवा विधानात्मक होत चाललेल्या काळाच्या, भाषेच्या पाश्र्वभूमीवर ही कविता मला अधिक महत्त्वाची वाटते. हा संवाद गद्य असला तरी त्यात एक आंतरिक लय आहेच. एखादा अनुभव इतक्या सहजतेने, उत्कटतेने मांडता येणे, ही गोष्ट मला अधिक महत्त्वाची वाटते. `अनटायटल्ड’ ही कविता मला त्या दृष्टीने आवडलेली रचना आहे.