ये रे ये रे पैसा / सलील वाघ
माझ्या अलीकडे स्वप्नात
येतो अेक उंच टंगाळ्या हत्ती
नांदेडच्या गुरुद्वारामधला पाण्याचा पाट
कम्प्यूटरसमोर फोडलेले नारळ
मुंबईत दिल्लीत बंगरूळात मद्रासात
बेंबीखाली चारबोटं साडी नेसलेली गच्च ठाणाफास्ट आन्टी
चोरावर उगारलेला चॉपर
अॅनी बेझंट रोडवर मध्यरात्री
विंडोनायंटीफाय मधल्या अेरर्स
ऑनलाइन ऑफलाइनची लफडी; नेटवर्किंग
स्पीडपोस्टनी आलेलं अपॉइंटमेंट लेटर
हिराभाई डायमंडचे अंडरवल्र्ड नीतिनियम
अल्ला हूँ अकबरच्या सुरात
सूर मिळवून भुंकणारी कुत्री
सुलतानपल्ड्या मशिदीवरचा हिरव्या लाईटचा प्रकाश
आर टी नगरचं पोस्ट ऑफिस
मल्ल्याळम स्पेलचेकरच्या ट्रायल्स
माझ्या अलीकडे स्वप्नात
येतो अेक उंच टंगाळ्या हत्ती
एक विक्राळ विघ्नकर्ता माळरानावर झुलतोय
माजलेलं गवत खातोय
सिमेन्स वॅâथेपॅसिफिक कोक
स्टारटीव्ही एचटीए स्ट्यांचार्ट
हेच आमचे क्लायंट हीच आमची दैवतं
हेच भाग्यविधाते
हेच आमचं भावविश्व
हीच आमची दुनिया
आम्ही आयुष्य जगत नव्हतोच
फक्त काम करत होतो
फक्त सव्र्हाइव्ह होत होतो
कसेबसे तगून
जगण्याच्या ढेपेला कडकडून
चिकटून होतो
झोपेपासून जाग येईपर्यन्त
जाग आल्यापासून झोपायला मिळेपर्यन्त
परफॉरमन्सच्या पिंगपाँगवर उसळत होतो
माझ्या अलीकडे स्वप्नात
येतो अेक उंच टंगाळ्या हत्ती
एक विक्राळ विघ्नकर्ता माळरानावर झुलतोय
माजलेलं गवत खातोय
एक विक्राळ विघ्नकर्ता
माळरानावर झुलतोय
नो शशांक आय एम नॉट कमिटेड
आय एम नॉट पेâथपूâल
आय एम नॉट ट्रस्टेबल
आय हॅव प्रूव्हड यू राँग
मी लोकांना गंडिवतो
मी यूएसबीवाले आयमॅक दाखवतो
मी येड्या लोकांना चुत्त्या बनवतो आणि
चुत्त्या लोकांना येडा बनवतो
मी पायरॅटेड सॉफ्टवेअर विकतो
तासाभरात पाहिजे ती सीडी कॉपी करून देतो
सगळे मॅनेजर व्हीपी डायरेक्टर सीईओ मॅनेजिंग डायरेक्टर्स
डेव्हलपर्स इंजिनीअर्स प्रोग्रॅमर कन्सल्टंट्स डॉक्टर्स प्रोपेâसर्स शेठ साहेब यू नेम इट
सगळे झक मारतात
आमच्या दारात
आमच्या पायाशी
ओरॅकल डीटूके व्हिज्युअल स्टुडिओ
ऑटोवॅâड प्रो-ई आर्ट-प्रो एम पी थ्री
आणि डॉटेड
वो निग्रो देख क्या
क्या बत्ती लगा रहा है बे दैत साला
वो चायनीज डॉगशॉट देख
बहोत जाएगी ये सीडी
आठसो-बारासो के बीच रखनेकी
डॉक्टर लोढासाबने कित्ते बेचे ऐसे
मुंबईपासून मद्रासपर्यंत
दुबईपासून सिंगापूरपर्यंत
पसरलेलं इंद्रधनुष्य
भगवानभाई चाचा बॉबी विकी
हेच आमचे सखेसांगाती
मुंबई-दिल्लीपर्यंत पोचलेले हात
हेच आमचे गणगोत
हेच आमचं भावविश्व
हीच आमची दुनिया
सदाशिवपेठेपासून सॅनप्रँâसिस्कोपर्यंत
कोथरूडपासून कोरेगावपर्यंत
देशोदेशी हा पसरलेला तवंग
दाट गडद
गंडांतराच्या सावटाभोवती
रेंगाळणारे दिनक्रम
माझ्या अलीकडे स्वप्नात येतं
गावाकडच्या बावडीत फिरणारं
तळकासव
विहिरीवरून
पाणी पिणारं आख्खं गाव
स्फटिकासारखे निर्मळ झरे
कमी कमी होत आटत गेलेले
पैसा आला आणि गेला
पायाशी पेâसाळून
ना कधी पाय ओले झाले
ना कधी हात ओले झाले
पैसा आला नि गेला
पायाशी फेसाळून
ना कधी पाय ओले झाले ना कधी हात ओले झाले
भूमिका: सलील वाघ यांच्या `सध्याच्या कविता’ या कवितासंग्रहातील `ये रे ये रे पावसा’ ही कविता तिच्यातील समकालीनताभिमुख आशय व अभिव्यक्ती विशेषांमुळे मला विशेष आवडली. यात नवभांडवलशाही व्यवस्थेने सामाजिक जीवनात रुजविलेल्या चंगळवादी जीवनशैलीचा अनवट रीतीने उपहास केला आहे. `ये रे ये रे पावसा’ ऐवजी `ये रे ये रे पैसा’ हे शीर्षक सलामीतच समाजातील मूल्यस्थानांतराची सूचक जाणीव करून देते. लोकगीताचे अपभ्रंशात्मक उपयोजन, मराठी, हिंदी इंग्रजी शब्दांच्या संमिश्रणातून नियत झालेला चपखल भाषासंकर नवी काव्यभाषा घडवतो. महानगर ते ग्रामीण जीवन असा मोठा पैस कवेत घेणारा आशय, संवाद, निवेदनादी तंत्रांचा कुशल वापर, कथनाचा दुहेरी आविष्कार, `टंगाळ्या हत्ती’ या नावार्थबोधक प्रतीकाची योजना, अर्थाच्या पातळीवरील वक्रतेमुळे या कवितेत शब्द, वाक्य, अर्थ, भाषा, लय अशा विविध स्तरांतील नियमोल्लंघन अनुभवाला येते. या कवितेत काळानुरूप काव्यसौंदर्याचा आविष्कार झालेला असल्याने ही उत्तर-आधुनिक संहिता ठरते.
कवितेचे रसग्रहण: प्रस्तुत कवितेत समकालीन जीवनव्यवहारातील पैसावेंâद्री वृत्ती व त्याचे संवेदनक्षम मनावर झालेले आघात यांचे पडघम ऐवूâ येतात. कवितेचे शीर्षक प्रत्येक मराठी माणसाने पावसाळ्यात म्हटलेल्या `ये रे ये रे पावसा’ या लोकगीताची आठवण जागविते. या लोकगीतात पाऊस येण्याआधी पावसाला दिलेले पैशाचे आमिष खोटे ठरते, पाऊस मोठा येतो. या वर्णनातून हा पाऊस-पाणी महत्त्वाचे व पैसा गौण आहे हा मूल्यसंस्कार आपल्या मनावर नकळतपणे झालेला असतो. तसेच पाऊस-पाणी निसर्गनिर्मित वस्तू तर पैसा मानवनिर्मित वस्तू, पाण्याचे महत्त्व व्यापक व कालातीत तर पैशाचे महत्त्व मर्यादित व तात्कालिक. आपल्या पैशाविषयीच्या सांस्कृतिक धारणेवरील आक्रमण `ये रे ये रे पैसा’ या शीर्षकातून सूचित करण्यात आलेले आहे.
कवितेच्या पूर्वार्धात कवितेतील `मी’च्या स्वप्नात आलेल्या घटितांचे कथन आहे. यात स्वप्नात येणारा एक उंच टंगाळ्या हत्ती, नांदेडच्या गुरुद्वारामधला पाण्याचा पाट, कम्प्युटरसमोर चार शहरांत फोडलेले नारळ, मादक आन्टी, अॅनी बेझंट रोडवर मध्यरात्री चोरावर उगारलेला चॉपर, संगणकीय कामाचे वर्णन, स्पीडपोस्टने आलेले अपॉइंटमेंट लेटर,
मशिदीतील सुरात सूर मिसळणारी कुत्री, मशिदीवरील हिरव्या दिव्याचा प्रकाश, आर टी नगराचे पोस्ट ऑफिस व मल्याळम स्पेलचेकरच्या ट्रायल्स या घटितांची वर्णने आहेत. वरवर पहिले तर हे स्वप्नाचे वर्णन आहे, असे वाटते परंतु ते तितकेच नाही. या घटितांतील उंच टंगाळ्या हत्ती हे खलनायकाच्या वृत्तीचे प्रतीक म्हणून येते. कवितेतील `मी’ हा एक संगणकीय व्यवहार करणाNया बहुराष्ट्रीय वंâपनीतील नोकर आहे. तर उंच टंगाळ्या हत्ती हा या वंâपनीचा मालक म्हणून प्रतीकात्मकरीत्या स्वप्नात येतो. स्वप्नात येणाNया घटितांवर आपले नियंत्रण नसते. परस्परांशी संबंध असलेले घटना प्रसंग स्वप्नात असंबद्धरीत्या येऊ शकतात. स्वप्नातील प्रतिमांना, प्रतीकांना अर्थ असतो. स्वप्नात कल्पनेच्या भराNया असतात. त्यातून इच्छापूर्ती होते. या अर्थाने पाहिले तर कवितेतील `मी’च्या सबोध व अबोध मनातील भाव-भावनांचे प्रकटीकरण म्हणजे ही स्वप्नातील घटिते होय. पहिल्या घटितातील उंच टंगाळ्या हत्ती हा हत्तीही आहे आणि नाहीही. तर दुसNया घटितात नांदेडच्या गुरुद्वारामधला
पाण्याचा पाट हे पावित्र्याचे प्रतीक म्हणून येते. पुढच्या घटितातील वर्णनातून संगणकातही देव पाहणाNया भारतीय सश्रद्ध मनोवृत्तीचे दर्शन घडते.
तर पुढच्या घटितातील मादक स्त्री, चोरावर उगारलेला चॉपर, स्पीडपोस्टने आलेले
अपॉइंटमेंट लेटर या वास्तवात अशक्य वाटणाNया कृतींतून इच्छापूर्ती करून घेण्यात
आलेली आहे. हिराभाई डायमंडच्या अंडरवल्र्ड नीतिनियमांविषयीचा उल्लेख येतो. यातून हिरे उद्योगाचा गुन्हेगारी जगताशी असलेल्या संबंधाकडे निर्देश करण्यात आलेला आहे.
तर पुढचे घटित अतिशय वेधक आहे. अल्लाच्या प्रार्थनेत सूर मिळवून भुंकणारी कुत्री, या वर्णनातून प्रार्थनेतील सुरांचा कुत्र्यांवर झालेला प्रभाव, त्यांच्या भुंकण्याची बदललेली शैली ही त्यांच्यात झालेले मूलभूत परिवर्तन दर्शविते. अल्लाच्या प्रार्थनेने प्राण्यांतही बदल होतो, परंतु माणसांत होत नाही, असे सूचित होते. हा बदल कसा सकारात्मक समृद्धतेचा अनुभव देणारा आहे, ही अनुभूती माशिदीवरच्या हिरव्या लाईटच्या प्रकाशाच्या वर्णनातून व्यक्त करण्यात आलेली आहे. पुढे आर टी नगरचे पोस्ट ऑफिस व मल्याळम स्पेलचेकरच्या ट्रायल्स ही एकरेषीय घटिते येतात.
स्वप्नात आलेल्या एक उंच टंगाळ्या हत्तीच्या प्रतीकाचा आपण घेतलेला अर्थ, त्याच्याविषयीच्या विक्राळ व विघ्नहर्ता या विशेषणांतून अधिक ठळक होतो. हत्तीविषयीचे हे वर्णन नाहीच. हत्तीचा `आकार’ आपल्या मनावर जो व्यापक परिणाम करतो तो अधिक परिणामकारक करण्यासाठी `टंगाळ्या’ असा शब्दपयोग केलेला आहे. त्यातून टांगा(पाय) उंच असलेला असा अर्थ प्रक्षेपित होतो. प्रचलित धारणांनुसार हिंदू धर्मग्रंथांत हत्तीला पवित्र मानलेले आहे. गणपतीचे डोके हे हत्तीच्या रूपातील आहे. कवितेतील `टंगाळ्या’ हत्ती हा विक्राळ व विघ्न निर्माण करणारा असल्याने तो हिंसक व स्वाभाविकच अपवित्र आहे. म्हणजेच आपण मनात असलेल्या अर्थाप्रमाणे कवितेतील हत्ती नाही. तो माळरानावर झुलतोय आणि माजलेले गवत खातोय या वर्णनातून त्याची मदमस्त वृत्ती कळते. हे माळरान म्हणजे समाज होय. यातील गवत म्हणजे पैसा होय. असा अर्थ घेतला तर हत्तीची विक्राळ वृत्ती व विघ्नकारकतेतून कवीला
जे सुचवायचे आहे त्याचा उलगडा होत जातो.
कवितेतील `मी’ने अंगीकारलेल्या अपरिहार्य लबाडीचे कथन, बहुराष्ट्रीय वंâपनीतील कामगारांच्या मूल्यNहासाची उजळणी करणारे आहे. कवितेतील `मी’ने खासगी कामासाठी दिलेली भरपूर वेळ, त्यासाठी आयुष्यातील आनंद देणाNया गोष्टींपासूनचे दुरावणे याविषयीची अनुभूती, आयुष्य जगत नव्हतोच, फक्त काम करत होतो, फक्त सव्र्हाइव्ह होत होतो अशी व्यक्त करण्यात आलेली आहे. `जगण्याच्या ढेपेला कडकडून चिकटून होतो’ या प्रतिमेतून आपल्या अस्तित्वसंघर्षासाठीची पराकाष्टा सूचित करण्यात आलेली आहे.
खासगी वंâपनीतील कामगारांच्या परफॉर्मन्सला अतीव महत्त्व असल्याने कामगारांत जीवघेणी स्पर्धा लावली जाते. रात्रंदिवस वंâपनीतील कामाचा विचार सॉफ्टवेअर वंâपनीतील लोक करतात, आपल्या जीवनातील इतर अनेक सुखद गोष्टींपासून ते दुरावतात.
परफॉर्मन्सविषयीच्या भ्रामक गोष्टीत अडकल्याचे वर्णन `परफॉर्मन्सच्या पिंगपाँगवर उसळत होतो’ असे करण्यात आलेले आहे. यातून कवितेतील `मी’च्या हतबलता अधोरेखित होते.
पुन्हा स्वप्नात एक टंगाळ्या हत्तीच्या येण्याचे कथन करण्यात आलेले आहे. टंगाळ्या हत्तीचे स्वप्नात येणे या कृतीची आवृत्ती कवितेतील कथनाला उठाव प्राप्त करून देते, कवितेतील `मी’ला न-नैतिकतेची आठवण करून देते. ही न-नैतिकता शशांकशी झालेल्या संवादातून ठळकपणे पुढे येते. बहुराष्ट्रीय वंâपन्यांनी नपेâखोरीसाठी आपल्या कामगारांना नैतिक मूल्यांचा त्याग करण्याची पक्की शिकवणूक दिल्याने, वस्तू विकण्यासाठी उदाहरणार्थ पायरेटेड सॉफ्टवेअर, लोकांना गंडविणे, वेड्यात काढणे, च्युत्त्या बनविणे हा कामाच्या
परफॉर्मन्सशी निगडित महत्त्वाचा भाग बनतो. ओरिजिनल वस्तू रीतसर घेण्यापेक्षा
पायरेटेड सॉफ्टवेअर घेण्याची मानसिकता छछोर व्हिडीओंच्या सीडी विकत घेऊन पाहणारे
आंबटशौकीन, त्याच्याशी संबंधित आंतरराष्ट्रीय पातळीवर पसरलेले मनीमार्केट, याविषयीच्या मूल्यर्हासाची जाणीव `देशोदेशी हा पसरलेला तवंग’ या प्रतिमेतून करून देण्यात येते. महानगरात आपल्याप्रमाणेच इतर लोकही पैसे कमावण्याच्या हावरटपणातून अनेक प्रकारच्या मूल्यहीन तडजोडी करीत आहेत. कवितेतील `मी’ला त्याच्या संवेदनक्षम वृत्तीमुळे महानगरी जीवनावरील हे दाट गडद गंडांतर असून त्याच्या सावटाभोवती सर्व दिनक्रम रेंगाळत आहेत असे वाटते.
कवितेच्या उत्तरार्धात कवितेतील `मी’ला पुन्हा एक स्वप्न पडते. आधीची स्वप्ने महानगरी जीवन व्यवहाराशी संबंधित होती. पण हे स्वप्न ग्रामीण जीवनाशी निगडित आहे. त्याच्या स्वप्नात गावाकडच्या विहिरीत फिरणारे तळकासव येते. `मी’च्या कुटुंबीयांची मालकी असलेल्या
एकाच विहिरीचे पाणी गावातील सर्व लोक पितात. कालौघात स्फटिकासारखे निर्मळ झरे कमी होऊन, आटत गेल्याचे वर्णन येते. या कवितेत दोन मुख्य कथने कवीने समोरासमोर ठेवलेली आहेत. कवितेच्या पूर्वार्धात व मध्यात महानगरीय चंगळवादी पैसापिपासू किडक्या मनोवृत्तीच्या समाजाचे, त्यातील व्रूâरतेचा, शोषणाचा पट रंगविणारे कथन आहे. तर उत्तरार्धात ग्रामजीवनातील उदारतेचे, सहिष्णुतेचे व मानवतेचे दर्शन घडविणारे कथन आहे. कवितेतील `मी’ची या दोनही समाज व्यवस्थेत भटकंती होते. ग्रामीण जीवनातील समाज व्यवस्थेचा त्याच्यावरील प्रभाव त्याला परोपकारी व उदार जीवनमूल्यांचा अंगीकार करायला प्रभावित करते. महानगरातील जीवन आपण जगू शकलो नाही ही जाणीव मानवी अस्तित्वाच्या कुंठीततेची अनुभूती देते. त्याला माणसाचे अवमूल्यन नकोसे वाटते. पैशांसाठीचे जगणे सोडून जगण्यापुरता पैसा हवा, या वृत्तीला तो प्राधान्य देतो. पैशांपासून आपण दूर राहिलो, पैसावेंâद्री वृत्तीचा त्याग केला, हे `पैसा आला आणि गेला/ पायाशी फेसाळून’ असे सांगतो. `ना कधी पाय ओले झाले/ ना कधी हात ओले झाले’ या ओळींच्या आवृत्तीतून आपल्या नीतिमान जीवनमार्गाच्या अंगीकाराचे भान अधिक ठळकपणे व्यक्त होते.
सलील वाघ यांच्या खास शैलीतील ही संहिता उत्तराधुनिक प्रयोगशील अभिव्यक्तीचा उत्तम नमुना आहे. ती वाचकाच्या अर्थनिर्णयनक्षमतेला व्यायाम देणारी, बौद्धिकतेला खाद्य पुरविणारी आणि आनंदानुभूती द्विगुणीत करणारी आजची कविता आहे.