१.
आरसे
पुन्हा पुन्हा पुसावे लागतात
स्वप्नांचे थर घट्ट झाले की,
सैरभैर होऊन जातं आयुष्य
स्वप्नांचे आरसे धूसर
होऊ नयेत म्हणून
लख्ख पुसलं पाहिजे कवितेलाही
२.
एका स्वप्नासाठी
किती हट्ट धरला होतास
पडझड खूप झाली
स्वप्न पांगत गेलं
झालं दिसेनासं
३.
अनाकलनीय पोकळी
आलीय आयुष्यात
अकस्मात
भरून येत नाही
कशानंही पोकळी
कुठल्या स्वप्नांची
प्रतीक्षा आहे
या पोकळीला
४.
गर्दी ओलांडताना
घट्ट धरून
हात माझा
जपून चालणं
तुलाच जमतं
फक्त
सर्व रस्ते निर्मनुष्य
आजकाल
आणि सोबत
फक्त तुझी.
५.
सभोवताली
बहरावर बहर येत गेले
आणि झडतही गेले
एक तुझा बहर
कधी झडलाच नाही
६.
स्वप्नात सारखी
स्वप्नंच येताहेत
विरूनही जाताहेत
कुठे कुठे
फिरत असतात ही स्वप्नं
आज माझ्या स्वप्नात
उद्या दुसर्याच्या
परवा तिसर्या कुणाच्या
अलीकडे मात्र
मला भयंकर स्वप्ने पडताहेत
रात्री-अपरात्री
दचकून जागा होत असतो
मी गाढ झोपेतनं
कुणीतरी मला बांधतंय
उचलून नेतंय
आणि बेवारस म्हणून
अनोळखी जागी फेकून देतंय
७.
उलटून जातात दिवस
उलटून जातात रात्री
पुन्हा मागे वळून
पाहताच येत नाही
जगण्यासाठी पुढेच
चालावं लागतं
आयुष्य असतं फारच थोडं
आणि स्वप्नांचं आकाश तर
खूपच उंच असतं
जपून जगावा एकेक दिवस
जपून जगावी एकेक रात्र
८.
कालचे रंग
आता हळूहळू
बदलू लागलेत
अंतर्बाह्य
संयमी झालोय आम्ही
बोधीवृक्षाच्या
शीतल घनदाट सावलीत
हळुवार तृष्णामुक्त होतोय
मी आणि
माझी कविता