मराठी समीक्षक आधुनिकवादी साहित्य, उत्तराधुनिक साहित्य, त्यात पुन्हा दलित, ग्रामीण, शहरी, स्त्रीवादी असे साहित्याचे तुकडे तुकडे करतात. असं करण्याची खरंच गरज आहे का? गावं शहरात आणि शहर गावात घुसल्यामुळे आणि खासकरून डिजिटायझेशनमुळे विव्रेâता आणि ग्राहक याच माणसाच्या दोन जाती झाल्या आहेत. कशी असावी मग समीक्षा? काय वाटते तुम्हाला?
असा एक ढोबळ प्रश्न अभिधानंतरचे संपादक हेमंत दिवटे यांनी चर्चेला घेतला आहे. कशी असावी समीक्षा? हा या चर्चेतला महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मी येथे कसे असावे कवितेचे वाचन? किंवा कवितेचा आस्वाद कसा घ्यावा? यावर माझे मत मांडत आहे. कवितेचे वाचन ही कवितेच्या आस्वादाची पहिली अट आहे. येथे सुरुवातीलाच रेनर मारिया रिल्के यांचे या संदर्भातील एक वाक्य उद््धृत करतो. ‘कलेला कलाकाराचा स्वाद असतो, आस्वादकाच्या जिव्हेवर तो सार्थ होतो.’ कवी किंवा कलावंत त्यांच्या जीवनसंदर्भातून त्यांना येणाऱ्या अनुभूती आपल्या कलेतून, कवितेतून मांडत असतो. या आविष्कारात तो निर्मितीचा आनंद घेतो. कवी शब्दांशी झगडून तो त्याला आलेली अनुभूती शब्दांच्या माध्यमातून आविष्कृत करतो. हे करीत असताना कवीची शब्दसंपदा, अनुभवाचे वेगळेपण, विचार, जीवनविषयक दृष्टिकोन, शैली या साऱ्या घटकाचा परिणाम त्याच्या अभिव्यक्तीवर होत असतो. हेमंत दिवटे यांच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे—
‘कवितेच्या ओळीला
चिकटलेला असतो
आयुष्याचा कुठला तरी क्षण’ म्हणजेच जीवनानुभव हा कवितेचा गाभा आहे. त्यातून काहीएक जीवनदृष्टी, जीवनमूल्य प्रकट होत असतात. आता हा कलावंत किंवा कवी ज्या प्रदेशात राहतो, तिथली काही भू-सांस्कृतिक वैशिष्ट्ये त्याच्या कलेत दिसून येतात. आणि ही भू-सांस्कृतिक वैशिष्ट्ये प्रदेशानुसार भिन्न असतात तसेच ती व्यक्तीगणिकही भिन्न असू शकतात. यासाठी आपण मराठीतील काही प्रातिनिधिक कवींच्या कवितेच्या ओळी समोर ठेवू या. या ओळी समोर ठेवताना या कवितांना एका विशिष्ट तुकड्यात ठेवून त्यांची समीक्षा करणं योग्य आहे का हेही पाहणार आहोत. विवेक मोहन राजापुरे सारखा कवी जख्ख महानगराच्या वळचणीला बसून मरणोत्तर शाश्वत ठरेल असा महाशब्द लिहू पाहतो. असे असले तरी महानगरीय कवी अशा संकुचित दृष्टीने त्यांच्या कवितेकडे पाहता येत नाही. मलिका अमरशेख यांना दिसणारं महानगर वेगळं आहे,
आणि थोड्या उंच इमारती
थोड्या उघड्या बायका
थोडेसे नागडे पुरुष
थोडीशी पोटांची एकाकी बेटं
थोडीशी यंत्र, माणसांना खाणारी
थोडासा माणूस माणसांना खाणारा
महानगर म्हणजे अजून काय असतं
अलीकडे वसंत गुर्जरांच्या कोलाहल या कवितेतील महानगर,
घे खोका
घे
पेटी
घे
वंâटेनर
तू जा
कर्जतला
तू जा
कसाऱ्याला
तू जा
पालघरला
तू जा
तानाजी मालुसरे शिडीत
तू जा न्यानो घरात
टा टा कर
मुंबईला.
स्थावर मालमत्ता विकासकांचे नवनवे शिखर गाठणारी मुंबई फक्त धनाढ्य लोकांचे इमले बांधणारे महानगर बनवण्याचा घातलेला घाट आणि त्यासाठी कामगाराबरोबरच, मध्यमवर्गीय माणसाला या महानगरातून हाकलून लावले जात आहे, त्यांना ‘घे खोका’ असे पैशाचे आमिष दाखवून उपनगरात पाठवले जात आहे, टोलेजंग इमारती, टॉवर्स, हॉटेल्स, शॉपिंग मॉल्स उभारून मुंबईचे शांघाय करण्याच्या प्रयत्नात सामान्य माणूस मुंबईबाहेर पेâकला
जात असल्याची जाणीव उपरोक्त कवितेत व्यक्त झाली आहे. मुंबईत बदलत असलेले सामान्य कष्टकरी माणसाचे स्थानही ही कविता अधोरेखित करते. मलिका अमरशेख आणि वसंत गुर्जर महानगरीय जीवनसंदर्भाने कविता लिहीत असले तरी या अवकाशात त्यांना येणारी अनुभूती ही वेगळी आहे. त्याचा जीवनसंदर्भ वेगळा आहे, संवेदन वेगळे आहे. या दोन्ही कवितांची महानगरीय कविता अशा सूत्रात मोट बांधणे शक्य नाही.
तर अरुण काळे यांच्या कविता सामान्यांच्या बोलभाषेतून अखिल मानव्याविषयी व्यापक सहानुभाव बाळगून द्रष्टेपणाने काही भाष्य करणारी; निखळ मानवतावादी जाणिवांनी व्यक्त होत होती.
माणूस भंगारात येऊ नये म्हणतो
कवितेतून पुन्हा पुन्हा उगवत राहतो.
अशी भूमिका घेऊन अरुण काळे यांची कविता अवतरली आहे. या भूमिकेला विशिष्ट विचारसरणीला बांधून ठेवणे म्हणजे व्यापक मानव्य विचाराला अधिक संकुचित करण्यासारखे होईल.
मुलांच्या पालानपोषणातील एक्साइटमेंट संपून गेलीय
उलट त्याच्या स्वूâलच्या अॅडमिशन अँक्झायटीने
मीच परीक्षेला बसलीये असं वाटतंय
जागतिकीकरणाच्या रेट्यात निर्माण झालेली प्रचंड स्पर्धा आणि शिक्षणाचा खेळखंडोबा आणि आईवडिलांवर, मुलांवर पडलेला ताण, निर्माण होणारी अॅडमिशन अँक्झायटी स्त्रीच्या मनोगतातून व्यक्त झाली आहे. अशा बदलाचा सूक्ष्म वेध कवी श्रीधर तिळवे यांची कविता घेते. असे असले तरी श्रीधर तिळवे यांच्या कवितेतील अनुभव साधारणीच्या पातळीवर जाऊन व्यापक जीवनानुभव व्यक्त करतो.
मात्र मित्राच्या बायकोनं कपाटातून व्हॅक्युम क्लिनर काढला
तेव्हा
लटपटलोच
निघालो घाई-घाई करीत फ्लॅटबाहेर
वाटलं आता ओढला जाईन की काय?
फोलपटासारखा फरशीवरल्या धुळीबरोबर
अभावग्रस्त जीवन जगताना दोन वेळच्या दाल-चावलाची सोय लावताना करावी लागणारी तंगडतोड असा संघर्षमय जीवन जगणाऱ्या तरुणांची व्हॅक्युम क्लिनरसारख्या वस्तूकडे पाहून आतल्या आत होत असलेली घुसमट आहे ही घुसमट सोलंकीच्या कविता समर्थपणे व्यक्त झाली आहे. ही घुसमट केवळ महानगरीय तरुणांची कविता या तुकड्यात विभागता येत नाही.
मराठीनं भिकेस लावलं
तर इंग्लिशचा गू चिवडला
सगळ्या पळवाटा
विकत घेऊन दुखले कुल्ले (ज्याम मज्जा, पृ. १०)
मन्या जोशीच्या कवितेत नव्या काळातला भाषिक पेच अभिव्यक्त झाला आहे. मराठीची होणारी पीछेहाट होत असल्याची खंत आणि इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव स्वीकारण्याशिवाय पर्याय नसल्याने होत असलेली चिडचिड, संताप, अगतिकता मन्या जोशी व्यक्त करतात. आता हा पेच केवळ मन्या जोशी ज्या वातावरणात, प्रदेशात वावरतात त्यापुरता मर्यादित राहिला नाही. त्यामुळे ही कविता विशिष्ट वर्गीयांची, समूहाची असे म्हणता येत नाही.
समकाल येईना वेंगेत आणि लंगडते भाषा अशा प्रत्ययकारी शब्दात कवी वीरधवल परब समाजवास्तवातील बदलांचे नेमकेपणाने आकलन होत नसल्याचे आणि संभ्रमित अवस्थेचे चित्रण करतात. भाषा आणि गावाचे होत असलेले ग्लोबल व्हिलेज असा संघर्ष कवीसमोर आहे. गावचे होणारे ग्लोबल विलेज, ढासळलेली मूल्यव्यवस्था, चळवळीची झालेली पीछेहाट, ग्लोबल होत गेलेल्या व्हिलेजमधले कष्टकरी वर्गांचे अनेक प्रश्न हे वीरधवल परब यांच्या कवितेचे सूत्र आहे. तर श्रीकांत देशमुख कृषी संस्कृतीचा गौरव करीत उजळमाथ्याने कुणबीपण आपल्या कवितेतून मिरवतात. छोट्या छोट्या अनुभूतीतून आपल्या आदिमातेचा शोध घेणारी कवी दिनकर मनवर यांची कविता, माणसाला बोलण्यासाठी माणूस भेटावा अशी तरल अनुभूती व्यक्त करणारी अभय दाणी यांची कविता, आयुष्याचा सूक्ष्मसा क्षणही कवितेत आणू पाहणारी कवी रवींद्र लाखे यांची कविता तसेच नव्या पिढीतील इग्नेशियस डायस, संदीप जगदाळे, महेश लोंढे, पेâलिक्स डिसोजा, विनायक येवले, स्वप्निल शेळके, नामदेव कोळी, सत्यपालसिंग राजपूत, सुदाम राठोड यांची कविता आणि या कवितेचे वाचन दलित, ग्रामीण, शहरी, स्त्रीवादी अशा विशिष्ट अशा तुकड्यात करता येईल का? किंवा ह्या कवितेचा आस्वाद नेमका कसा घेता येईल? तर या पिढीतील कवी आपल्या कवितेला अशा विशिष्ट तुकड्यात स्वत:ला विभागून घेण्यास उत्साही दिसत नाहीत, ते एका अर्थाने चांगलेच आहे. त्यामुळे त्यांच्या कवितेची समीक्षा अशी विद्यापीठीय पातळीवर सोडल्यास अशा नियतकालिकातून ठरवून तुकड्या तुकड्यात होणे कठीण दिसतेय. कवितेचा किंवा एवूâणच कलेचा अनुभव हा समग्रतेने घेता यायला हवा, नाहीतर कप्पेबंद मानसिकता आपल्यला कलेच्या निखळ अनुभवापासून दूर लोटू शकते. आपल्याकडे १९६० नंतर जी भू-सांस्कृतिकदृष्ट्या वा विचासरणीच्या स्वीकारावरून जे वेगळेपण कवितेत निर्माण झाले त्यातून ग्रामीण, महानगरीय, दलित, स्त्रीवादी, आदिवासी साहित्य असे प्रवाह निर्माण झाले. विद्यापीठीय अभ्यासाच्या सोयीनुसार हे प्रवाह मानले गेले किंवा स्वीकारले. मात्र या कप्पेबंद मांडणीत अजून एक शक्यता दिसते ती म्हणजे या कप्पेबंद मांडणीतून आपल्या समूहाची, आपण लिहीत असलेली कविताच महत्त्वाची आणि इतरांची कविता ही कविता नाहीच असे उघड राजकारण अशा कवितेच्या समीक्षेत निर्माण होत असावे. म्हणून त्या त्या गटाने आपल्याच समूहात असलेल्या कवितेवर चर्चा घडवून आणत आपल्या समूहाचा एक तुकडा, एक बेट निर्माण करण्याचा प्रयत्न केला असावा. अशा प्रकारचे बेट निर्माण होऊन कवितेचे वाचन वा समीक्षा होणे चांगल्या कवितेला मारक ठरू शकते. तर राहिला मुद्दा बदलत्या काळानुसार बदलत असलेले जीवन, जीवनसंदर्भ नव्या भानासह कवितेत यायलाच हवेत, मात्र कवी, कलावंत कविता लिहितो तेव्हा ‘कवितेच्या ओळीला चिकटलेला असतो आयुष्याचा कुठलातरी क्षण’ कवीच्या आयुष्यातील या क्षणाच्या अनुभूतीला कुठलाही पूर्वग्रहाशिवाय वाचक म्हणून निर्मळपणे भिडता येणे म्हणजेच रेनर मारिया रिल्के यांचे कला हा अनुभूतीचा प्रदेश असतो, वर्णनाचा नसतो हे विधान समजून घेणे होय.
्ेदलर््ैafात्गर््े१९८२ॅुस्aग्त्.म्दस्