Home August 2021ओपिनियन जागतिक साहित्य म्हणजे काय?- सुनील तांबे

जागतिक साहित्य म्हणजे काय?- सुनील तांबे

माणूस वैश्विक आहे, परंतु वैश्विक माणूस नसतो. जागतिक साहित्य, जागतिक सिनेमा, जागतिक संगीत, जागतिक चित्र, जागतिक चित्रपट असं काहीही नसतं. कोणत्याही कलाकृतीचा परिसर आणि काळ समजला तरच त्या कलाकृतीचा अधिक चांगला आस्वाद घेता येतो.

मराठी साहित्य वा भारतीय साहित्य इंग्रजी भाषेत अनुवादित व्हायला हवं अशी अनेक राजकीय नेते व मतदारांची धारणा असते. अनेक वाचकांनाही तसं वाटतं. इंग्रजी वा प्रेंâच भाषेतील साहित्य मराठीत अनुवादित होतं त्या वेळी मराठी भाषा समृद्ध होते. मराठी भाषेतील साहित्याचा अनुवाद इंग्रजी वा प्रेंâच भाषेत झाला तर इंग्रजी वा प्रेंâच भाषा समृद्ध होते. अमेरिकन साहित्याचा मराठी भाषेत अनुवाद करण्याची योजना अमेरिकन सरकारने काही दशकांपूर्वी राबवली होती. मात्र मराठी भाषा समृद्ध करण्याचा धंदा अमेरिकेलाही परवडला नाही. महाराष्ट्रात मात्र मराठी साहित्याच्या परदेशी भाषांमधील अनुवादासाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा अशा मागण्या केल्या जातात.

कोणत्याही भाषेतली गोष्ट वा कथा वा कादंबरी असो— पात्रं, परिसर, कथावस्तू, संघर्ष आणि उकल वा निरास, हे पाच घटक अनिवार्य असतात. पात्रं रंगवणं, कथावस्तू उभी करणं, संघर्ष चितारणं आणि उकल वा निरास यांची मांडणी करणं ही तंत्रं आहेत. तंत्रज्ञान हे नेहमीच जागतिक असतं, कारण तंत्रज्ञानामुळे उपभोग्य वस्तूंची उपभोग्यता वाढते.  डॉन क्विझोट- सँको प्लान्सा ही जोडगोळी मराठी साहित्यात चिमणराव-गुंड्याभाऊ या रूपात अवतीर्ण होते. आप्रिâकन चित्रकला वा मुखवटे पिकासोच्या चित्रात एकजीव होतात. अकिरा कुरोसावा यांचा ‘सेव्हन सामुराई’ हा चित्रपट ‘मॅग्निफिशिअंट सेव्हन’ या रूपात हॉलीवूडमध्ये अवतरतो. ‘शोले’ आणि ‘चायना गेट’ त्याच चित्रपटाच्या हिंदी आवृत्या आहेत. सत्यजित राय यांच्या कथांमधून स्टीव्हन स्पीलबर्गला ‘ईटी’ आणि ‘क्लोज एन्काऊंटर’ हे दोन चित्रपट सुचले (त्याने सत्यजित राय यांना त्याचं श्रेय वा स्वामीत्वहक्काची रक्कम दिली नाही, पण तो मुद्दा वेगळा).

मराठी कादंबरीत प्रेम असायलाच हवं असा दंडक होता. नेमाडेंच्या कोसलाने तो मोडला. या कादंबरीत स्त्री पात्रच नाही. कादंबरी म्हणजे काय याचं नवं भान नेमाडेंनी मराठी वाचकाला दिलं. त्यातून अनेक लेखक, नवे लेखक निर्माण झाले. फ्रंन्झ काफ्काने एकही कादंबरी पूर्ण लिहिली नाही, प्रकरणांचे क्रमही त्याने लावलेले नव्हते. मात्र त्याने युरोपियन कादंबरीपुढचा प्लॉटचा प्रश्न सोडवला असं विलास सारंग यांनी नोंदवलं आहे. काफ्काच्या तंत्राचा वापर गॅब्रिअल गार्सिया मार्खेज या लेखकाने त्याच्या कादंबरीतील काही प्रसंग रंगवताना केला आहे. श्याम मनोहर यांच्या कादंबरीत मोटर गॅरेजवाला हीच एका पात्राची ओळख आहे. ‘शंभर मी’ या कादंबरीत श्याम मनोहर यांनी फिक्शनच्या सीमांचा अनेक दिशांना विस्तार केला आहे. वास्तव आणि जादू या दोन परस्परविरोधी संकल्पना आहेत. परंतु गॅब्रिएल गार्सिया मार्खेजच्या कादंबरीत त्या गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात त्यामुळे वास्तवाच्या वेगळ्या मिती वाचकाला मिळतात. मार्खेजच्या कादंबर्‍यांनी इसाबेला आयंदेच्या कथा-कादंबर्‍यांचा रस्ता मोकळा केला.

कथा, कादंबरी, कविता, नाटक यांच्या तंत्रामध्ये नवीन शोध लावणं म्हणजे जागतिक भानाचं साहित्य निर्माण करणं. भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर, अरुण कोलटकर, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, नामदेव ढसाळ हे जागतिक भान असणारे मराठीतील साहित्यिक आहेत. हिंदीमध्ये फणिश्वरनाथ रेणु, विनोद कुमार शुक्ल ही नावं मला चटकन सुचतात. अमिताभ घोष या इंग्रजी लेखकाचं नावही महत्त्वाचं आहे. अर्थात यापेक्षाही अनेक भारतीय व मराठी लेखक जागतिक भानाचं साहित्य निर्माण करत असतील. जागतिक भानाचं साहित्य म्हणजे काय हे स्पष्ट करण्यासाठी उदाहरणादाखल मी काही लेखकांची नावं घेतली, एवढंच.