Home August 2021ओपिनियन जागतिक साहित्य म्हणजे काय?- कमलाकर भट

जागतिक साहित्य म्हणजे काय?- कमलाकर भट

जागतिक साहित्य एकाच वेळी अशक्य आणि अपरिहार्य असे दोन्हीही आहे. या गोंधळात टाकणार्‍या विधानाचा अधिक विस्तार करण्यापूर्वी, जागतिक साहित्य या संकल्पनेची चर्चा करणार्‍या प्रमुख गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे.

‘राष्ट्रीय साहित्य आता एक अर्थहीन संज्ञा झाली आहे; जागतिक साहित्याचे युग जवळ आले आहे आणि प्रत्येकाने प्रयत्नपूर्वक हे युग लवकरात लवकर अस्तित्वात आणावे’ या गटेच्या १८२७ सालच्या सुप्रसिद्ध वक्तव्यापासून जागतिक साहित्य हे नेहमीच राष्ट्रीय साहित्याचे बायनरी (विरुद्ध) मानले गेले आहे. जागतिक साहित्याच्या अध्ययनाचे अनेक पदर या बायनरीवर आधारित आहेत आणि जगातील अनेक देशांमधून (सर्व देशांतून नव्हे), निवडलेले काही साहित्य हे जागतिक साहित्य असल्याचा दावा करण्यात येतो. विद्यापीठ अभ्यासक्रम, भाषांतर कॅटलॉग आणि साहित्य उत्सव/संमेलने यांच्या याद्यांमध्ये असे जागतिक साहित्य विशेषत: आढळून येते.

हे सर्व आणखी एक गोष्ट सूचित करते- जागतिक साहित्याचाr प्रसार क्षमता. मार्क्स आणि एंगेल्स यांनी आपल्या कम्युनिस्ट मॅनिफेस्टोमधून हेच तत्त्व अधोरेखित केले आहे. ते म्हणतात : ‘साहित्याप्रमाणे, बौद्धिक उत्पादनातही वैयक्तिक राष्ट्रांची बौद्धिक निर्मिती सामान्य मालमत्ता बनते. राष्ट्रीय एकतर्फीपणा आणि संकुचित वृत्ती अधिकाधिक अशक्य होत जातात आणि असंख्य राष्ट्रीय आणि स्थानिक साहित्य कृतींमधून जागतिक साहित्य निर्माण होते.’ जागतिक साहित्याची निर्मिती ही बाजारपेठेतील शक्तींचा परिणाम आहे, हे मार्क्स आणि एंगेल्स यांच्या वक्तव्यावरून सूचित होते. जर आपण अनुवादित पुस्तकांच्या प्रकाशन-प्रसार-विनिमय या प्रक्रियांचा आणि विविध जागतिक ग्रंथ पुरस्कारांचा विचार केला तर जागतिक साहित्य निश्चित करण्यात बाजारपेठेची भूमिका स्पष्ट होते.

तुलनात्मक साहित्यात आपल्याला जागतिक साहित्याची आणखी एक संकल्पना पाहण्यास मिळते. येथे, विविध साहित्यिक संस्कृतींमध्ये आढळणारे साहित्यिक आकृतिबंध, थीम्स (आशय), शैली, प्रकार/धारा (जॉनर) यांचे पैलू साहित्याच्या ‘सार्वत्रिक’ स्वरूपाचे प्रतिनिधित्व करताना दिसतात. जागतिक साहित्याच्या बर्‍याच व्याख्या त्यांनी आखलेल्या ‘अमुक साहित्य म्हणजेच जागतिक’ या चौकटीमुळे अडचणीच्या वाटतात. सुझन लॅन्सर या अशा निवडींबाबत आपल्या ‘कम्पेर्ड टु व्हॉट? ग्लोबल फेमनीजम, कम्पॅरिटिझ्म, अ‍ॅण्ड द मास्टरझ टूल्स’ या निबंधात म्हणतात : अशी निवड करणारे किंवा चौकात आखणारे मानसिकदृष्ट्या फार फार तर एक किंवा दोन (सामान्यत: पाश्चात्त्य) देशांमध्ये राहतात, एका तिसर्‍या देशात प्रतीकात्मक उन्हाळ्याची सुट्टी घालवतात व काही ठिकाणांना धावत्या भेटी देतात. याचा अर्थ असा की, हे लोक पूर्णपणे त्या प्रदेशाच्या साहित्याच्या आकलनापासून खूप दूर आहेत.

हे सर्व अनेक प्रश्न उपस्थित करते : साहित्य सर्व संस्कृतींमध्ये समान प्रकारे कार्य करते का? फक्त काही साहित्य प्रकारांचेच जागतिक साहित्यावर वर्चस्व का आहे?

डिजिटल सोशल मीडिया हे जागतिक साहित्याच्या निर्मिती व प्रसारासाठी एक उदयोन्मुख माध्यम आहे- फेसबुक, इन्स्टाग्राम, ब्लॉग्स, ऑनलाइन फोरम इत्यादीद्वारे-अनेक साहित्यिक- जिवंत अथवा मृत -यांच्या साहित्याची देवाणघेवाण मूळ भाषेतून अथवा अनुवादांतून सोशल मीडियाच्या माध्यमातून होताना दिसते- या देवाणघेवाणीतून जागतिक साहित्याचे एक क्षणिक प्रमाण (कॅनन) घडताना दिसते. मी त्याला क्षणिक म्हणालो, याला कारण

आहे- सोशल मीडिया साहित्याला सीमा व प्रांत ओलांडण्यास साहाय्यीभूत ठरत असले तरी कोणत्याही एका प्रकारचे साहित्य जागतिक साहित्य म्हणून मान्य पावलेले दिसत नाही. सोशल मीडियावरचे हे साहित्य इतके वैविध्यपूर्ण आहे आणि इतके वेगाने बदलत आहे की, कोणतेही एक प्रकारचे साहित्य ‘जागतिक साहित्याचे’ प्रतिनिधित्व करते असे म्हणता येणार नाही. या विविधता आणि अस्थैर्यामुळे बहुविध आयामांचे जागतिक साहित्य निर्माण होणे शक्य होत आहे. सोशल मीडियाचे हे सर्वात मोठे योगदान आहे असे मला वाटते.

 गुरुदेव टागोर आपल्या १९०७ साली लिहिलेल्या जागतिक साहित्य या निबंधात याला स्पर्श करताना म्हणतात- ‘प्रत्येक लेखकाच्या विशिष्ट कृतीमध्ये आपण एक संपूर्णत: ओळखू आणि या संपूर्णतेमध्ये अभिव्यक्तीच्या सर्व मानवी प्रयत्नांमधील परस्परसंबंध जाणू. अशाप्रकारे साहित्यिक कृतींमध्ये स्वाभाविकपणे एक संभाव्य जागतिक अपील असू शकते, तरीही प्रत्यक्षात कधीही कुठलीही साहित्य कृती सर्वसमावेशक अथवा जगातील सर्व साहित्याचे प्रतिनिधित्व करू शकेल अशी नसते; आणि म्हणूनच जागतिक साहित्य अशक्य असले तरी अपरिहार्य आहे या विरोधाभासात आपल्याला राहावे लागते.