Home August 2021ओपिनियन जागतिक साहित्य म्हणजे काय?- प्रवीण बांदेकर

जागतिक साहित्य म्हणजे काय?- प्रवीण बांदेकर

गायत्री चक्रवर्ती स्पिवाक या विदुषीने म्हटलं आहे की, तुमच्या भाषेचं राजकीय सामर्थ्य जितकं जास्त तितकं तुमचं साहित्य जास्तीत जास्त जागतिक पातळीवर जाऊन पोहोचत असतं. साहित्याच्या दर्जापेक्षा राजकीय हस्तक्षेप तुम्हाला जागतिक स्तरावर पोचवण्यासाठी जास्त उपयुक्त ठरत असतो. हे सांगताना त्यांनी वसाहतकालातील ब्रिटिश राजवटीचं आणि त्यामुळे दुय्यम-तिय्यम दर्जाचेही अनेक इंग्रजी लेखक भाषांतराच्या माध्यमातून जगभर पोचून महत्त्वाचे लेखक कसे मानले जाऊ लागले, या संदर्भातील काही उदाहरणे दिली आहेत. ग्रेट ब्रिटनप्रमाणेच रशिया, अमेरिका किंंवा जपान, चीनसारखे देश महासत्ता असताना किंवा त्या दिशेने वाटचाल करत असताना त्या त्या देशातील संबंधित भाषांमधील लेखक जागतिक पातळीवर महत्त्वाचे ठरले आहेत. यातील अनेक लेखकांना बूकर, नोबेल पुरस्कार यांसारख्या काही सर्वोच्च मानल्या जाणार्‍या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. असे लेखक अनुवादामुळे जगभरातल्या असंख्य छोट्या छोट्या देशांत बोलल्या जाणार्‍या स्थानिक भाषांमध्ये पोचले आहेत. या लेखकांनी त्यांच्या कलाकृतींमधून मांडलेली मूल्ये, घेतलेला मानवी संबंधांचा शोध, जगण्याशी निगडित असलेल्या प्रश्नांची चर्चा, वापरलेली भाषिक शैली, रूपबंध असं सगळं साहजिकच या छोट्या भाषिक समूहांमध्ये जागतिक महत्त्वाचं मानलं जाऊ लागलं. आपण जे काही लिहीत आहोत ते स्थानिक मूल्यांशी संबंधित म्हणून कमअस्सल आणि हे जगातल्या अनेक भाषांमध्ये पोचलेलं कोट्यवधी प्रतींच्या रूपात खपणारं साहित्यच खरं जागतिक दर्जाचं साहित्य असा एक प्रकारचा समज आणि त्यातून येणारा न्यूनगंड स्थानिक भाषांतील लेखकांच्या मनामध्ये निर्माण झालेला दिसतो. पण खरोखरच सरसकट हे सगळं साहित्य जागतिक दर्जाचं म्हणता येईल इतकं महत्त्वाचं आहे का? की केवळ व्यापारी दृष्टिकोन असलेल्या सत्ताधीशांनी या लेखकांना जागतिक दर्जाचं बनवलं आहे, हा खरा कळीचा प्रश्न आहे.

या अनुषंगाने मराठी साहित्याचा विचार करताना काय दिसतं? मराठी साहित्य कुठल्याही अर्थाने खरंच जागतिक दर्जाचं आहे का, हा काहीसा कुत्सित सुरात मराठीसह अन्य भाषांमधील शंकासुरांकडून वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. जागतिक असणं म्हणजे काय, याविषयी मतमतांतरे संभवू शकतात. मला या चिरंजीव स्वरूपाच्या अनुत्तरित प्रश्नाची चर्चा करण्याआधी त्याला पूरक ठरणार्‍या काही आनुषंगिक प्रश्नांची थोडी चर्चा करावीशी वाटतेय. ती अशी : मुळात ज्याला आपण साहित्य म्हणतो ते नेमकं काय असतं? सरसकट सगळं लेखन साहित्य म्हणता येईल का? किंंवा त्यालाच जोडून असंही म्हणता येईल की, लेखक/कवी कुणाला म्हणायचं? लिहिलं म्हणजे लेखक वा कवी झाला, असं असतं का? आणि मग जागतिक साहित्य किंंवा जागतिक पातळीवरचा साहित्यिक ही काय भानगड असावी? मला अनेकदा हे प्रश्न छळत असतात.

समकाळातला मी एक लेखक आहे, असं मी विधान करतो, तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय होतो? भाषा हे माध्यम वापरून अभिव्यक्ती करणारी मी एक व्यक्ती आहे; आणि मी जे काही लिहितो वा बोलतो ते छापून येते, ते काही लोक वाचतात, त्यावर बर्‍या-वाईट प्रतिक्रिया देतात, मूल्यमापन करतात, म्हणून मी लेखक आहे; एवढ्या मर्यादित अर्थाने आपण या विधानाकडे पाहू शकतो का? लेखकाचं लेखक असणं नेमकं कशामुळे असतं? लिहिण्यामुळे की ज्या विशिष्ट सामाजिक, सांस्कृतिक घटकांशी तो लिहिण्याच्या प्रक्रियेमुळे मानसिक आणि बौद्धिक पातळीवर जोडला गेलेला असतो, त्या घटकांशी असलेल्या त्याच्या क्रिया-प्रतिक्रियात्मक सहसंबंधांमुळे? ते जागतिक असणं वगैरे जाऊ दे, पण मुळात आधी, लेखकाला लेखकत्व बहाल करण्यामागे असे काही विशिष्ट सामाजिक, सांस्कृतिक घटक कारणीभूत ठरत असावेत का? किंंवा या घटकांना टाळून लेखन ही कृती करता येणं शक्य आहे का? भालचंद्र नेमाडे यांनी आदिलेखकाची प्रतिमा मांडताना लेखकही सामाजिक सांस्कृतिक व्यवस्थेतील एक जबाबदार व्यक्ती असल्याचे सांगितले आहे. लेखकामध्ये संपूर्ण समाजमानस सामावलेले असते. त्यामुळे साहित्य व्यवहाराच्या केंद्रस्थानी आपले लेखक हे अस्तित्व आणताना लेखकाने आपली ही आदिलेखकाची उग्र प्रतिमा टिकवणे नेमाडेंना गरजेचे वाटते. लेखक हा एक सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व्यवस्थांमध्ये हस्तक्षेप करणारा उपद्व्यापी घटक मानल्याने बर्‍यावाईटाचे उत्तरदायित्वही एकाच लेखक या व्यक्तीवर पडताना दिसते. अशा काही निरीक्षणांच्या अनुषंगाने लेखक वा कवीचे जागतिक होणे या गोष्टीकडे कसं पाहता येऊ शकेल याविषयी काही विचार करावासा वाटतो.

आपण समजा, अगदी स्वत:संबंधी क्रमश: विचार केला की, आपण अगदी सुरुवातीला चोरून कविता लिहीत होतो तेव्हा आपल्या घरातल्यांनाही ही गोष्ट माहीत नव्हती. पुढे आपल्या कविता वेगवेगळ्या नियतकालिकांतून प्रसिद्ध होऊ लागल्या तेव्हाही आपल्या घरच्यांसह गल्लीतले लोक आपल्याला कवी म्हणून काही ओळखत नव्हते. पुढे कवितासंग्रह वगैरे आल्यावर बरोबरच्या चारदोन मित्रांना, सहकार्‍यांना वगैरे कळलं, आपण्ा कविता लिहितो, म्हणजे आपण कवी वगैरे आहोत. पण तसं क्वचितच कुणी आपल्याला सन्मानदर्शक शब्दांत बोलून दाखवलं असेल. आता समजा, ह्याच माझ्या कविता इंग्रजी किंंवा तत्सम एखाद्या जगातल्या अनेक देशांत बोलल्या जाणार्‍या भाषेत अनुवादित झाल्या तर आपण जागतिक वगैरे कवी होऊ शकतो का? हे कुणी ठरवायचं? कसं ठरवायचं? मुळात माझ्या मायबोलीतच मला कुणी कवी मानत नसतील किंंवा मी कवी आहे हे चारदोन मित्रांच्या पलीकडे कुणाला माहीतही नसताना मी केवळ भाषांतराच्या माध्यमातून इंग्रजी वा अन्य दुसर्‍या जागतिक भाषेत गेलो म्हणून स्वत:ला जागतिक कवी म्हणवून घेणं हे हास्यास्पदच म्हणावं लागेल. याचा अर्थ, जागतिक ठरण्यासाठी काही तरी वेगळे घटक त्यासाठी विचारात घ्यावे लागतील. एक म्हणजे मुळात मी ज्या माझ्या भाषेत लिहीत आहे त्या भाषेत माझं वेगळेपण, माझा दर्जा, माझं कवित्व मला सिद्ध करावं लागेल. आपण जेव्हा तुकारामांना जागतिक दर्जाचा कवी म्हणतो, कोलटकर, चित्रे, ढसाळ वगैरेंच्या कवितांमध्ये आपल्याला जागतिक कवितेचे गुण दिसतात, तेव्हा मुळात त्या सगळ्यांच्या कविता दुसर्‍या भाषेत जाण्याआधीच त्यांचा एक विशिष्ट निकषांवर आधारित दर्जा आपल्या मनात निश्चित झालेला असतो. जागतिक दर्जाचे हे निकष जगातील विविध भाषांतील उत्तमोत्तम कविता वाचून जाणकार वाचकांच्या मनात पक्का झालेला असतो. कवी वा लेखकाचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आपल्या जगण्यातील काही विशिष्ट शाश्वत मूल्ये, काही विशिष्ट नैसर्गिक वा मानवनिर्मित घटना-प्रसंगांच्या वेळी माणसांकडून केला जाणारा वर्तनव्यवहार, मानवी नातेसंबंध, मानव व निसर्गातील अन्य घटक यांच्यातील नातेसंबंधांविषयक लेखकाची भूमिका, आपल्या जगण्यातील व्यक्तिगत अनुभवांचे आंतरिकीकरण करून दिलेली वैश्विक अनुभूती, सामाजिक- सांस्कृतिक- राजकीय व्यवस्थांमधील लेखकीय हस्तक्षेप, अशा काही अंगांनी साहित्याकडे पाहात असताना काही गोष्टी आपल्या हाती लागू शकतात. त्याशिवाय लेखनांतर्गत भाषा घडवणे, निवेदनकौशल्य, अन्य आविष्कार तंत्रांतील नावीन्य वा प्रयोगशीलता अशा अन्य निकषांधारेही या कलाकृतीकडे पाहता येईल.

या काही निकषांधारे आपल्याला जगभरातले अनेक लेखक, कवी, नाटककार महत्त्वाचे जागतिक लेखक आहेत हे लक्षात येऊ शकतं. जगण्यातील अनुभवांना स्वत:ची कल्पनाशक्ती, निरीक्षण क्षमता, निवेदनशैली, चिंतनशीलता यांच्या आधारे त्यांनी सार्वकालिक बनवलेलं आहे. जगातील कुठल्याही प्रदेशातील, कुठल्याही भाषिक संस्कृतीतील, कुठल्याही काळातील वाचकाला हे लेखन वाचत असताना त्याच्याशी तादात्म्य पावता येतं. प्रत्येकाला त्यात कुठे तरी आपलं असं काही तरी सापडतं. मानवी भावभावना, कृतीविकृती, वासना, वर्तनव्यवहार, मूल्यव्यवस्था, या जगाच्या पाठीवरच्या कुठच्याही माणसाच्या बाबतीत सारख्याच असतात. काळ बदलला, परिसर बदलला तरी माणसाचे मानसिक, भावनिक, सांस्कृतिक वर्तनव्यवहार आदिम स्वरूपात नेणिवेच्या पातळीवर खोल दडलेले असतात. त्यामुळे वर्तमानातील त्याच्या कृतीउक्तीवर या नेणिवेतील आदिमतेची सावली पडलेली असू शकते. अशा काही गोष्टींचा शोध घेणारे लेखन जगभरातील काही लेखकांनी केले आहे. मराठीच्या संदर्भात विचार करताना तुकारामांसारखे कवी, साठोत्तर दशकाच्या कालखंडातील अरुण कोलटकर, दिलीप चित्रे, नामदेव ढसाळ, गुरुनाथ धुरी यांच्यासारखे कवी, भालचंद्र नेमाडे, भाऊ पाध्ये, यांच्यासारखे कादंबरीकार, विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर यांच्यासारखे नाटककार मला स्वत:ला जागतिक दर्जाचे कवी-लेखक वाटतात.

शेवटी असं म्हणता येईल की, काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर जगभरातील महत्त्वाच्या लेखकांनी संपूर्ण मानवी जगणे कवेत घेणारे असे काही तरी नोंदवून ठेवले आहे. या नोंदींचा लसावी काढून जरी आजच्या काळाने उभ्या केलेल्या जगण्याच्या प्रश्नांकडे आजच्या वर्तमानातील लेखक कसा पाहतो आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला, तरी आपल्याला जागतिक जाणिवा-संवेदनांच्या जवळपास जाणारा लेखक-कवी सापडू शकेल असे म्हणता येईल.