Home August 2021ओपिनियन जागतिक साहित्य म्हणजे काय?- श्रीधर तिळवे नाईक

जागतिक साहित्य म्हणजे काय?- श्रीधर तिळवे नाईक

भालचंद्र नेमाडे ह्यांनी पॉप्युलर प्रकाशनाने आयोजित केलेल्या चर्चासोहळ्यात आंतरराष्ट्रीय लेखक किंवा आंतरराष्ट्रीय मूल्य असे काही अस्तित्वात नसते असे प्रतिपादन केले होते. अलीकडे सुनील तांबेंनी आंतरराष्ट्रीय भाषा किंवा आंतरराष्ट्रीय लेखक असे काही अस्तित्वात नसते असे प्रतिपादन केले आणि त्याला आमचे परममित्र नितीन रिंढे ह्यांनी दुजोरा दिला. ह्या निमित्ताने निर्माण झालेले काही विचार मी इथे मांडत आहे.

पहिली गोष्ट तीन कॅटेगरीज

१) आंतरराष्ट्रीय : आंतरराष्ट्रीयमध्ये सगळी राष्ट्रे अभिप्रेत नाहीत. दोन राष्ट्रांतील वाटाघाटींनाही आंतरराष्ट्रीय वाटाघाटी म्हटलं जातं. कम्युनिस्ट पक्षाची अनेक अधिवेशनं आंतरराष्ट्रीय असतात, त्यात प्रत्येक राष्ट्र सामावून घेतलं जाईलच असं नाही. 

२) पृथ्वीय (ग्लोबल )मध्ये किमान ९० टक्के राष्ट्रे शामिल असतात.

३) वैश्विक : वैश्विक हे एक मूल्य आहे स्वाभाविकरीत्या कला मूल्यही ज्याची चर्चा आपण शेवटी करणार आहे.

जगाच्या संस्कृती ह्या सध्या

१. ब्रह्मांडीय – कॉसमॉसल

२. विश्वीय – युनिव्हर्सल

३. पृथ्वीय – ग्लोबल

४. आंतरराष्ट्रीय – इंटरनॅशनल

५. राष्ट्रीय – नॅशनल

६. प्रादेशिक – रिजनल

७. देशी – व्हर्नाक्युलर

८. जमाती – ट्रायबल

९. पोटी – सबकल्चरल

अशा पातळीवर वावरत असतात आणि आज व्यक्तीची नागरिकी ओळख ही तो कुठल्या राष्ट्राचा आहे त्यावर ठरते म्हणजे जो भारताचा नागरिक तो भारतीय, स्पेन राष्ट्राचा नागरिक तो स्पॅनिश. त्या त्या राष्ट्रात त्या व्यक्तीची ओळख पुन्हा देशी व प्रादेशिक ओळखीत विभागली जाते म्हणजे भारतीयांची ओळख ही मराठी, बंगाली, िंहदी, तामिळ अशी ओळखली जाते म्हणजेच भारतीय ही मार्गी व मराठी ही प्रादेशिक/ देशी अशा दोन सांस्कृतिक ओळखी घेऊनच भारतीय मनुष्य जगत असतो. म्हणूनच अनेकदा भारतीय लेखक भारतीय मराठी, भारतीय बंगाली अशा ओळखीने वावरत असतो. ह्या दोन संस्कृतीच्या बाहेर एक तिसरी संस्कृती असते जिला आपण आदिवासी किंवा जमाती ओळख म्हणतो. ह्या संस्कृतीतील मनुष्य हा भारतीय आणि जमाती अशा दोन ओळखींनी वावरत असतो म्हणजे भारतीय गोंड किंवा भारतीय वारली. ह्या तिन्ही संस्कृतीत एक असा समुदाय असतो ज्याला त्या संस्कृतीत दुय्यम वा सर्वाधिक अधिकार असतात. अशा लोकांची त्या त्या मार्गी वा देशी वा जमाती संस्कृतीत एक स्वायत्त पोटसंस्कृती वावरत असते. तिला आपण पोटी म्हणतो. उदाहरणार्थ देशी संस्कृतीत अस्पृश्यांची वावरत असलेली संस्कृती किंवा मुंबईतील धारावीची संस्कृती किंवा गोंड संस्कृतीत वावरत असलेली परधनी संस्कृती 

भारतीय नागरिक हा असा स्वभावत: बहुसंस्कृतीय असतो. साहजिकच कलानिर्मितीच्यावेळी ह्या बहुसंस्कृतीच्या अंगाने अनेक प्रश्न निर्माण होतात. माझा मित्र भुजंग मेश्राम तर केवळ एका जमातीशी नव्हे तर अनेक आदिवासी जमातीशी निगडित राहिला आणि त्यामुळेच अनेक आदिवासी भाषांत व्यक्त झाला. आपल्याला भारतीय भाषांबरोबर इंग्लिशमध्ये लिहिणारे लोक द्विभाषिक लेखन संस्कृतीचे लेखक वाटतात, पण अनेक आदिवासी भाषांत लिहिणारा भुजंग बहुभाषिक लेखक वाटत नाही. असा हा बहुसांस्कृतिक भारतीय लेखक जोवर फक्त भारत नावाच्या राष्ट्रांतर्गत अवकाशावर लिहीत असतो तोवर सर्व काही ठीक चाललेले असते. पण जेव्हा तो भारताबरोबर इतर राष्ट्रांचा अवकाशही आपल्या लेखनात सामावून घेतो तेव्हा त्याला काय म्हणायचे, असा प्रश्न निर्माण होतो आणि जर का त्याचे वास्तव्य भारतात कमी व भारताबाहेर जास्त असेल तर हा प्रश्न अधिकच तीव्र होतो. अलीकडे ऑक्टॉव्हिया पाझने भारतीय धर्मावर अनेक कविता लिहिल्या. त्या स्पॅनिश भाषेत लिहिल्या म्हणून स्पॅनिश म्हणता येईल, पण त्या दोन राष्ट्रांच्या म्हणून आंतरराष्ट्रीय आहेत असेही म्हणता येईल. प्राचीन काळी राज्य हे पोलिटिकल युनिट होते पण तेव्हाही वाल्मीकींनी, व्यासांनी अनेक राज्यांच्या संस्कृती आपल्या महाकाव्यात आणून एक सर्वंकष अवकाशांच्या कलाकृती संस्कृत ह्या मार्गी भाषेत निर्माण केल्या होत्या. आता वाहतुकीची साधने वाढली. राज्याऐवजी राष्ट्र आले आणि त्यातूनच नव्या व्यास वाल्मीकींच्यापुढे त्यांच्या ओळखीचे नवे प्रश्न निर्माण झाले. सर्वात पेचदार प्रश्न कुठली भाषा वापरायची हा होता. कारण संस्कृत मृतप्राय झालेली आहे आणि येतही नाहीये साहजिकच ह्या प्रश्नाचे उत्तर अनेक राष्ट्रांत बोलली जाणारी आणि स्वत:ला येणारी आंतरराष्ट्रीय भाषा असे मिळवले गेले आणि सलमान रश्दींसारख्या लेखकांनी इंग्लिश ह्या आंतरराष्ट्रीय भाषेत लिहून त्या इंग्लिशला चटनीफाय करून भारतीय करून आंतरराष्ट्रीय लेखकाचा नवा फॉर्म निर्माण केला. तत्पूर्वी मार्गी इंग्लिश संस्कृतीत जन्मलेल्या आदिल जसावालासारख्या लोकांनी इंग्लिशमध्ये लेखन केले होते, पण त्याला मर्यादित ओळख प्राप्त झाली होती. आणि नेमाडे म्हणतात त्याप्रमाणे हे लेखन दर्जेदार नव्हते. पण सलमान रश्दीने ‘मिडनाईट्स चिल्ड्रन’ लिहून इंडियन इंग्लिशमध्ये लिखाण करूनही साहित्याची वैश्विक उंची गाठली जाऊ शकते हे सिद्ध केले. पुढे अरुंधती रॉय, अमिताव घोष, विक्रम सेठनी त्याला दुजोरा दिला आणि नेमाडेंची टीका अचानक अपआकलनाची प्रात्यक्षिक झाली. नेमाडे ज्या दर्जाला गाठणे अशक्य म्हणत होते तो दर्जा गाठला जाऊ लागला. असे लेखक जोवर एकाच राष्ट्राविषयी लिहीत होते तोवर त्यांना भारतीय म्हणून मोकळं होता येत होते, पण अमिताव घोष ह्यांच्या ‘सी ऑफ पॉपीज’ किंवा सलमान रश्दी ह्यांच्या ‘मूर्स लास्ट साय’ ह्यांना काय म्हणावयाचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. माझ्या मते दोन किंवा त्याहून अधिक राष्ट्रांची संस्कृती सातत्याने आपल्या कलाकृतीच्या अवकाशात आणणार्‍या लेखकाला इंटरनॅशनल लेखक म्हणावे तर दोन किंवा त्याहून अधिक संस्कृतींचा अवकाश ज्या कलाकृतीत आणला जाईल तिला आंतरराष्ट्रीय कलाकृती म्हणावे. उदा. एन्कीच्या राज्यातही विलास सारंगाची कलाकृती मराठी, भारतीय, अमेरिका व इराकी (सुमेरियन) अशा चार संस्कृती कवेत घेते. प्रमोद वेंगुर्लेकरचा हा प्रवास अस्तित्वकेंद्री असल्याने ह्या कादंबरीत इतर संस्कृतीविषयी वाटणारी परात्मता व ती संस्कृती आत्मसात करण्याचा प्रयत्न सतत ताणाबाण्यात दिसतो. स्वत:च्या अस्तित्वाची ओळख शोधायला आलेल्या प्रमोदला सांस्कृतिक दबावामुळे आपला शोध कुंठवावा लागतो आणि आपल्यापुढे प्रश्न पडतो की आंतरराष्ट्र्रीयता ही ह्या कादंबरीची गरज आहे का? हा अस्तित्वशोध कुठेही लागू शकला असता. जागतिक म्हणजे किमान ५० टक्के राष्ट्रे ज्या घटनेत सामील आहेत किंवा ज्याची व्याप्ती किमान जगाच्या ५० टक्के भूगोलाला टच करते अशी घटना किंवा कला. अशी कला निर्माण करता येईल का? अनेकदा मला वाटतं जागतिक आणि आंतरराष्ट्रीय ह्यात काहीतरी गल्लत होते. देशी भाषेतील पुस्तक भाषांतरामार्गे जागतिक होऊ शकते, पण सॅम्य्ाुएल बेकेटसारखा लेखक आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्लंड, आयर्लंड आणि फ्रंस अशा तीन राष्ट्रांतल्या लोकांसाठी लिहीत होता. व्ही. एस. नॉयपॉल व सलमान रश्दीच्या डोक्यात अनेक राष्ट्रांतील ऑडियन्स असावा असे वाटते. बाकी वैज्ञानिक, तंत्र वैज्ञानिक, चिन्ह वैज्ञानिक, चिन्हतंत्र वैज्ञानिक लेखक तर उघड उघड जागतिक वाचकांसाठी लिहीत असतात. केवळ साहित्यासाठी कोण समग्र संस्कृतीला देशीवादी वेठीस धरेल? खुद्द नेमाडे बदलतायत हे अलीकडच्या त्यांच्या गोष्टींवरून दिसते म्हणूनच मी नितीन रिंढेंना म्हणालो होतो की, ‘नितीन, असं होऊ नये की नेमाडे नूतन झालेत आणि तुम्ही जुन्या नेमाडेंच्यात थांबलाय.’ असो.

थोडक्यात काय, जो आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून आणि भाषांतून लिहितो आणि ज्याच्या कलाकृतीतील भूगोल एकापेक्षा अधिक राष्ट्रांतील आहे तो खरा आंतरराष्ट्रीय लेखक. ज्या भाषा अनेक राष्ट्रांत बोलल्या जातात त्या आंतरराष्ट्रीय आणि आता वेळ अशी आलीये की, अनेक भाषा आंतरराष्ट्रीय बनत चालल्यात. हिंदी, तमिळ, मराठी, बंगाली, वगैरे. हिंदी, तमिळ ह्यात आघाडीवर आहेत. गमतीचा भाग म्हणजे साहित्यात मात्र आंतरराष्ट्रीय लेखन इंडियन इंग्लिशमध्ये जास्त होतंय. ज्यात अमिताव घोष वगैरे येतात. एखादा लेखक जेव्हा अनेक राष्ट्रांचा भूगोल साहित्यात आणतो तेव्हा तोही आंतरराष्ट्रीय लेखक असतो, मग भले तो देशी भाषेत लिहीत असेल. उदा. विलास सारंग. बहुतेक आंतरराष्ट्रीय लेखक द्विभाषिक किंवा त्रैभाषिक लेखक असतात. अनेकदा तुम्ही ज्या भाषेत लिहिता त्या भाषेतला वाचकच एका राष्ट्रात सामावला जात नाही, अशा वेळी आपोआपच तुम्ही आंतरराष्ट्रीय वाचकांसाठी लिहायला लागता. आजकाल ब्रिटिश लेखक इंडियन व अमेरिकन वा आयरिश प्रेक्षक गृहीत धरून लिखाण करत असतो.

आता जागतिक आणि वैश्विक ह्यांची चर्चा करायला हरकत नाही. जग म्हणजे तुम्ही ज्यात जगता तो भूगोल. ह्यात प्रामुख्याने पृथ्वी येते किंवा राष्ट्र येते किंवा राज्य येते किंवा जिल्हा येतो किंवा पंचक्रोशी येते किंवा गाव व पाडा येतो किंवा वस्ती येते. ह्या अर्थाने प्रत्येक कृती जागतिकच असते. प्रश्न ती पृथ्वीय म्हणजे ग्लोबल आहे का हा असतो. ग्लोब आणि वर्ल्ड ह्या दोन शब्दांतला फरक लक्षात न आल्याने हे घडते.

वैश्विक कलाकृती म्हणजे काय?

वैश्विक म्हणजे वेगवेगळ्या देशांत जगणार्‍या पण तरीही प्रत्येकाच्या जगण्याच्या व जगाच्या मर्यादा पार करून पूर्ण वेगळे जगणे व जग अतिशय घन व गहन पद्धतीने सादर करणारी व सर्वांना अपील होणारी कलाकृती! व एकाहून अधिक वैश्विक कलाकृती निर्माण करणारा कलावंत म्हणजे वैश्विक कलावंत होय. प्रश्न असा की, मग कलाकृती व वाङ्मय वैश्विक कधी होते?

१. माझ्या मते जे वाङ्मय होमो सेपियन विथ नवता असते ते वैश्विक असते आणि अशा वाङ्मयातील सर्वात मोठा अडथळा देशीवाद असतो. माझ्या अनुभवाच्या पसार्‍यात मार्गी, देशी, जमाती व पोटी अशा चारी संस्कृती नांदत असतात. पण देशीवाद फक्त देशी संस्कृतीतील परंपरेचा आग्रह धरतो आणि माझ्या होमो सेपियनगिरीला विश्वीय होण्याला प्रतिबंध करतो. तो वसुधैव कुटुम्बकम्äा् हा कोल्ह्याचा आणि लबाड बगळ्याचा उपदेश आहे असं सांगून समुद्रपर्यटन करायला बंदी घालतो आणि होमो सेपियन्समध्ये फूट पाडत. आणि होमो सेपियन्समधील ०.००१ टक्के भेदाला ९९.९९ टक्के साम्यापेक्षा अधिक महत्त्व देतो. ह्या अर्थाने देशीवाद हा एक टक्केवाल्यांचा वाद आहे. जेव्हा एखादी कलाकृती अशा जगभरच्या देशीवादांना ओलांडून नवे अनुभवविश्व, नव्या जाणिवा व नव्या संवेदना खोलात नेऊन दाखवते तेव्हा ती कलाकृती वैश्विक होय. हे फक्त कलाकृतीतील नवतेमुळे शक्य होते. त्यामुळेच मराठीतील फक्त चौथ्या नवतेतील कलावंतांनाच वैश्विक होण्याचा चान्स आहे. ह्यापूर्वी चान्स फक्त देशीवाद्यांनाच होता, पण आता देशीवादी पॅटर्न्समधला तोचतोचपणा अंडरलाइन झाल्याने चौथ्या नवतेच्या साहित्यिकांनाच वैश्विक होण्याचा चान्स आहे.

२. ज्या कलाकृतीत अवकाशाचे सादरीकरण वैश्विक असते तीही वैश्विक होऊ शकते! ज्या कलाकृतीत एकाहून अधिक राष्ट्रांचे भूगोल असतील त्या आंतरराष्ट्रीय असल्या तरी त्या वैश्विक होतीलच ह्याची खात्री नाही. ह्याउलट एखादा चिंचोळा अवकाशसुद्धा संपूर्ण विश्वाला अपील करू शकतो. सायन्सच्या भाषेत सांगायचे तर मायक्रोयुनिव्हर्समध्ये मॅक्रोयुनिव्हर्स सादर करू शकतो. उदाहरणार्थ ‘वोिंटग फॉर गोदो’तला भूगोल कुठल्याच राष्ट्राशी निगडित नाही. तो ९० टक्के अमूर्त भूगोल आहे. म्हणून ती कलाकृती सहजरीत्या आंतरराष्ट्रीय होते, पृथ्वीय होते आणि सर्व जागांना व जगांना तिचे अपील म्हणून वैश्विकही होते. सुबोध जावडेकर, जी. ए. कुलकर्णी ह्यांच्यासारख्या लेखकांनी मराठीत ह्याचे प्रात्यक्षिक दाखवले आहे 

३. तिसरी कसोटी ही प्रोसायन्टिफिक असण्याची आहे. जर साहित्य किंवा कोणतीही कला प्रोसायन्टिफिक असेल तर तिचे वैश्विक होण्याचे चान्सेस अधिक असते. सध्या देशीवादाच्या काही कॉर्नरमधून जे काही अपप्रचार चाललेत त्यातील एक म्हणजे कल्चरल रायटिंग हेच क्रिएटिव्ह रायटिंग असते. प्रत्यक्षात क्रिएटिव्ह रायटिंग हे विज्ञान तंत्रज्ञानातही असते. फक्त साहित्यच क्रिएटिव्ह नसते. देशीवाद्यांना विज्ञान तंत्र्ाज्ञानाचा विचार करायचा नसतो, कारण तसा विचार केला की देशीवाद टिकत नाही. म्हणूनच वैज्ञानिक खुंटा सोडला जातो. मात्र देशीवादाचे समर्थन करण्यासाठी जनेटिक्स किंवा अँथ्रोपॉलॉजी वापरली की ते बरोबर असते. असो ह्यांच्या नादाला लागून प्रोसायन्टिफिक असणे सोडू नये.