Home August 2021ओपिनियन जागतिक साहित्य म्हणजे काय? – सचिन केतकर

जागतिक साहित्य म्हणजे काय? – सचिन केतकर

आज साहित्य वैश्विक बाजारपेठेचा भाग झाला आहे, ज्याला पास्कल केसनोवासारख्या विदुषी ‘World Republic of Letters’ म्हणते. ही व्यवस्था अर्थातच असमान आहे कारण पाश्चात्त्य साहित्य व संस्कृती तिच्या केंद्रात राहते व इतर साहित्य म्हणजे मराठी, मल्याळम वगैरे ह्या जागतिक व्यवस्थेच्या परिघावरच राहतात. जागतिक दर्जा म्हणजे काय बरेच वेळेला ही बाजारपेठ ठरवत असते. ही जागतिक बाजारपेठ स्थानिक/ राष्ट्रीय बाजारपेठेबरोबर नेहमीच आदान-प्रदान करत असते. हे आदान-प्रदान अनेक प्रकारचे असू शकते, उदाहरणार्थ भाषांतर, अन्य भाषेतल्या कृतींविषयी परिचयात्मक लेखन व समीक्षा, जागतिक पुरस्कार (नोबेल, बुकर, पुलित्झर वगैरे).

आज जर जागतिक दर्जा म्हणजे काय, हा प्रश्न मांडायचा असेल तर ह्या संदर्भातच मांडावा लागेल.

जागतिक साहित्य व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची विसाव्या शतकातली नावे कोणती आहेत?

त्यांच्या लेखनावर नजर फिरवली तर जागतिक दर्जाविषयी थोडी कल्पना येऊ शकेल :

दोस्तोव्हस्की, टॉल्स्टॉय, गोगोल, चेखोवसारखे थोडे पूर्वीचे रशियन लेखक, काफ्का, जॉईस, हेमिंग्वे, इलियट, फॉकनर, टोनी मोरिसॉन, मांडलस्तम, आख्मॅटोवा स्टीवन्स, जीन्सबर्ग, टेड ह्यूज, सिल्विया प्लाथ, विस्लीव्ह झिमबोरसका, मिलोझ, वास्को पोपा, आल्बेर काम्यू, ज्या पॉल सार्त्र, बर्नार्ड शॉ, इब्सेन, ब्रेश्ट, बेकेट, इटलो कॅल्विनो, मिलान कुंदेरा, त्याचबरोबर गॅब्रिएल गार्सिया मार्खेस, होरचे लुईस बोर्हेझ, ऑक्टव्हिओ पाझ, मारिओ वर्गास लॉससा व पाब्लो नेरुदासारखे दक्षिण अमेरिकी लेखक आज जागतिक बाजारपेठेत महत्त्वाचे मानले जातात, कारण त्यांचे उत्तम अनुवाद व त्यांना नोबेलसारखे जागतिक पुरस्कारही मिळाले आहेत.

ह्या व्यवस्थेचे स्वत:चं राजकारण असलं तरी ह्या लेखकांनी मात्र स्वत:च्या भाषेलाच नव्हे जगातल्या इतर भाषेतल्या साहित्याला-मराठीसकट-घडवलं आहे हे कबूल करावं

लागेल.

ह्यांच्यामधली समान सूत्रं कोणती आहेत?

आशय आणि अभिव्यक्ती ह्या दोन्ही बाबींमध्ये कल्पकता व वेगळेपणा.

जवळजवळ सर्वांनीच फॉर्म आणि आधुनिक जीवनदृष्ट्या सखोल तात्त्विक असं वेगळं काही दिलं आहे व ग्राऊंड ब्रेकिंग काम केलं आहे.

देशीवादाची अवास्तव कल्पना बारगळल्यामुळे मराठी साहित्य अतिशय संकुचित झालंं होतं. त्याचबरोबर मराठीत पारंपरिक, सरधोपट, फॉर्म्युलावादी लेखन करण्याच्या वृत्ती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वैश्विक दर्जाचं लेखन दुर्मीळ आहे.

त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात मराठी वाचकसुद्धा भूतकाळग्रस्त, लेखकांसारखाच जातीवादी, संकुचित दृष्टी असलेला व बुळबुळीत लेखन वाचणारा असल्यामुळे वैश्विक दर्जाच्या मराठी लेखनाकडे पाठ फिरवताना दिसतो.

तरीही मराठीत अरुण कोलटकर, बाबुराव बागूल, नामदेव ढसाळ, सदानंद रेगे, दिलीप चित्रे, वसंत डहाके, व्यंकटेश माडगूळकर, कमल देसाई, आनंद जातेगावकर, ह. मो. मराठे, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर, विलास सारंग, चंद्रकांत खोत, वसंत गुर्जर, गंगाधर गाडगीळ, शाम मनोहर, मलिका अमर शेख, जी. ए. कुलकर्णी, कोसलाकार नेमाडे, किरण नगरकर, नंदा खरे वगैरेंनी विश्वसाहित्य पचवून स्वत:चं स्वतंत्र साहित्य मराठीत दिलं आहे. आजच्या पिढीत मकरंद साठे, अनिल दामले, संजीव खांडेकर, हेमंत दिवटे, कविता महाजन, नि. वि. कुलकर्णी, सलील वाघ, मन्या जोशी, दिनकर मनवर, कथाकार प्रज्ञा दया पवार, मंगेश नारायणराव काळे ही परंपरा पुढे नेत आहेत हे पाहून आनंद होतो.

परंतु हे सगळं साहित्य वैश्विक प्लॅटफॉर्मवर जायला हवं इतकं जात नाही म्हणून माझ्याकडून जितका होऊ शकतो इतका करतो. असे अनेक प्रयत्न इतरांनीही केले पाहिजेत. त्याचबरोबर मराठीतही हे लेखन केंद्रस्थानी असावं असं वाटतं.